कोडजाई नदीवरील कोळबांद्रे कॉजवे उखडला

शिर्दे-सडवली हद्दीकडून सडवे कोळबांद्रेकडे जाणाऱ्या मार्गावर कोडजाई नदीवरील कोडजाई कॉजवे पावसाच्या पुराने उखडल्याने या कॉजवेवरून जाणे धोक्याचे झाले आहे.

दापोली-जालगाव-शिर्दे-सडवलीमार्गे सडवे कोळबांद्रे या गावाकडे जाणाऱ्या मार्गावर कोळबांद्रे येथे कोडजाई नदीवर एक कॉजवे आहे. या कॉजवेची उंची कमी असल्याने कोडजाईला पुराचे पाणी आले, तरी या मार्गावरील वाहतूक बंद पडते. अशा कॉजवेऐवजी येथे उंच पुलाची उभारणी करणे आवश्यक आहे. या मार्गावरील रहिवाशांनी अनेकदा कोडजाईवर पुलाची मागणी करूनसुद्धा कोडजाईवरील पुलाचे बांधकाम होत नाही. त्यामुळे पावसाळ्यात हा मार्ग धोक्याचा ठरतो. यावेळी मुसळधार कोसळलेल्या पावसाने कोडजाईला पूर आला. पुराच्या प्रवाहाचा लोट पाहता कॉजवे उखडला आहे.

कॉजवेवर मधोमध खड्डा पडल्याने कॉजवेवरील वाहतूक आता धोक्याची झाली आहे; कारण कॉजवेवरील पडलेल्या खड्डयातून लोखंडी शिगा बाहेर आल्या आहेत. न जाणो या शिगांमध्ये रात्रीच्या अंधारात अथवा पुराचे पाणी जात असताना या बाहेर पडलेल्या लोखंडी शिगांमध्ये प्रवाशांचा पाय अडकण्याचा धोका आहे. या कॉजवेवरून कोळबांद्रे या गावाकडील सडवे वगैरे गावातील रहिवाशांना या महत्त्वाच्या कॉजवेचा वाहतुकीसाठी उपयोग होत असतो. त्याचप्रमाणे शिर्दे, सडवली आदी भागांकडील गावांसाठी कोळबांद्रेगावाकडे जाण्यासाठी याच मार्गाचा उपयोग करावा लागतो. अन्य दुसरा जवळाचा मार्ग नाही, त्यामुळे या मार्गाचे महत्त्व पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने कोळबांद्रे येथील कोडजाई नदीवरील उखडलेल्या कॉजवेची दुरुस्ती करून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत.