‘भाजपच्या निरोप समारंभाची तारीख…’; 5 राज्यांतील निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर काँग्रेस अध्यक्षांचा निशाणा

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी भाजपवर टीकास्त्र सोडले आणि ‘त्यांचा निरोपही जाहीर झाला आहे’, अशी प्रतिक्रिया खर्गे यांनी दिली आहे.

‘पाच राज्यांतील निवडणुकांच्या घोषणेबरोबरच भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचा निरोप समारंभ ही जाहीर झाला आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरममध्ये काँग्रेस पक्ष ताकदीने जनतेत जाणार आहे. लोककल्याण, सामाजिक न्याय आणि प्रगतीशील विकास ही काँग्रेस पक्षाची हमी आहे’, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

2024मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा बार उडाला. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणामध्ये नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. सोमवारी नवी दिल्लीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम, मतदानाची तारीख आणि मतमोजणीची तारखी जाहीर केली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मिझोरमा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणातील निवडणूक एकाच टप्प्यात, तर छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होईल. छत्तीसगडध्ये 90 जागा, मिझोरममध्ये 40 जागा, तेलंगणामध्ये 119 जागा, राजस्थानमध्ये 200 जागा आणि मध्य प्रदेशमध्ये 230 जागांसाठी मतदान होईल.

पाचपैकी दोन राज्यांमध्ये (छत्तीसगड आणि राजस्थान) काँग्रेसची सत्ता आहे, तर मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. तेलंगणामध्ये केसीआर यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समिती (बीआरएस), तर मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) सत्तेत आहे.

दरम्यान, मिझोरमच्या विधानसभेचा कार्यकाळ डिसेंबर 2023मध्ये संपणार असून इतर चार राज्यांचा कार्यकाळ जानेवारी 2024मध्ये संपणार आहे. पाचही राज्यात 669 जागांवर मतदान होणार असून जवळपास 16.14 कोटी मतदार आहेत. यातील 8.2 कोटी पुरुष, तर 7.8 कोटी महिला आहेत. यंदा 6.2 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करतील.

कोणत्या राज्यात कधी मतदान?

मिझोराम – 7 नोव्हेंबर
मध्य प्रदेश – 17 नोव्हेंबर
राजस्थान – 23 नोव्हेंबर
छत्तीसगड – 7 आणि 17 नोव्हेंबर
तेलंगणा – 30 नोव्हेंबर

दरम्यान, पाचही राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबर 2023 रोजी लागणार आहेत.