डॉक्टरांना वेठीला धरू नका ! डॉक्टर सेलची महापालिकेकडे मागणी 

मृत्यूचा दाखला देणाऱ्या खासगी डॉक्टरांना तो दाखला घेऊन महापालिकेच्या विभाग कार्यालयात स्वतः जाऊन सादर करावा लागणार आहे. महापालिकेचा हा निर्णय म्हणजे मृत्यूचा दाखला देणाऱ्या डॉक्टरांना वेठीस धरण्याचा प्रकार आहे. महापालिकेने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी डॉक्टर सेलच्या डॉ. विवेकानंद जाजू यांनी केली आहे. निर्णय मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे मृत्यूचा दाखला. या दाखल्यानंतर स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची परवानगी मिळते. त्यानंतर डॉक्टरांनी दिलेला दाखला आणि महापालिकेने दिलेली स्मशानातील लाकडांची पावती जोडून पालिका विभागात मृत्यूची नोंद केली जाते. मात्र, आता निधन झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाऐवजी मृत्यूची नोंद करण्यासाठी डॉक्टरांनाच प्रत्यक्ष वॉर्ड कार्यालयात जावे लागणार आहे. त्याचबरोबर रजिस्ट्रेशन स्टॅम्प आणि सहीही करावी लागणार आहे. यासाठी दोन ते तीन तास जाणार आहेत. अशा परिस्थितीत दवाखान्यातील रुग्णांना सोडून ही सर्व प्रक्रिया करत राहणे डॉक्टरांसाठी प्रचंड गैरसोयीचे आहे. याबाबतचे राज्य सरकारने काढलेले परिपत्रक मागे घ्यावे नाहीतर खासगी डॉक्टर मृत्यूचा दाखला देणे बंद करतील, असा इशाराही डॉ. जाजू यांनी दिला आहे.