एसटी चालवताना मोबाईलवर बोलाल तर नोकरी गमवाल! निलंबनाची कारवाई करण्याचे महामंडळाचे निर्देश

बस चालवताना मोबाईलवर बोलणे, हेडपह्न घालून मोबाईलमधील गाणी ऐकणे अथवा व्हिडीओ बघणे आता एसटी चालकांना महागात पडणार आहे. अशी कृत्ये करणाऱया चालकांवर कडक कारवाईचे निर्देश एसटी महामंडळाने दिले आहेत.

एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. गेली 75 वर्षे प्रवाशांची विश्वासर्हता जपण्यामध्ये एसटीच्या वाहन चालकांचा खूप मोठा वाटा आहे. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये एसटी बस चालवत असताना मोबाईलवर बोलणे, हेडपह्न घालून गाणी ऐकणे, मोबाईलवरील व्हिडीओ बघणे अशा चालकांच्या कृत्यामुळे बसमधून प्रवास करणाऱया प्रवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना बळावली आहे. याबद्दल समाज माध्यमातून, लोकप्रतिनिधींमार्फत अनेक तक्रारी एसटी महामंडळाकडे दाखल झाल्या आहेत. यापुढे अशा घटना निदर्शनास आल्यास संबंधीत चालकावर निलंबनापर्यंतची कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी वरिष्ठ प्रशासनाने दिले आहेत.

एसटीच्या ताफ्यात लवकरच 2200 साध्या बस
एसटीच्या ताफ्यात लवकरच 2200 साध्या बस येणार आहेत. या बस खरेदी करण्यासाठी महामंडळाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. मार्च 2024 अखेर एसटीच्या ताफ्यात या बस समाविष्ट होतील, असा अंदाज आहे. बस लवकरात लवकर प्रवाशांच्या सेवेत रुजू व्हाव्यात यासाठी एसटी महामंडळाने प्रथमतः थेट तयार बस घेण्यासाठी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात निविदा प्रक्रिया राबविली आहे. यापूर्वी एसटी महामंडळ चासिस म्हणजे सांगाडा खरेदी करून त्यावर आपल्या मध्यवर्ती कार्यशाळेत बस बांधणी करीत असे.