शनिवार, रविवारी परळपासून चिंचपोकळीपर्यंत एकमार्गी वाहतूक करा, आगमन मिरवणुकीसाठी समन्वय समितीची मागणी

परळ वर्कशॉप आणि करी रोडमधील गणसंकुल कार्यशाळांमधून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठय़ा मूर्ती शनिवार आणि रविवारी मुंबई व मुंबईबाहेर जात असतात. यावेळी भाविकांची मोठी गर्दी होते आणि वाहतूककोंडीही होत असते. त्या पार्श्वभूमीवर, शनिवार आणि रविवारी परळमधील गौरीशंकर ते लालबागजवळील चिंचपोकळी परिसरापर्यंत वाहतूक एकमार्गी करा. त्यामुळे आगमन मिरवणुकीसाठी भाविकांची गर्दी आणि वाहतूककोंडी होणार नाही, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडे केली आहे.

गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक राहिले असताना सजावटीसाठी मंडळे आता शनिवार आणि रविवारी मोठय़ा गणेशमूर्ती घेऊन जात आहेत. या मोठय़ा गणेशमूर्ती परळ, लालबाग आणि आसपासच्या परिसरातील कार्यशाळांमधून बनवल्या जातात, मात्र या मूर्ती शनिवार, रविवारी नेताना भाविकांची गर्दी आणि वाहतूककोंडी होते. गणेशोत्सवासारख्या मोठय़ा आणि पवित्र सणावेळी या दोन्ही गोष्टी टाळण्यासाठी परळमधील गौरीशंकर मिठाईवाला ते चिंचपोकळीमधील श्रॉफ बिल्डिंगपर्यंत वाहतूक व्यवस्था एकमार्गी केली जावी, असा पर्याय समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी वाहतूक पोलिसांना सुचवला आहे.

अवजड वाहनांना परवानगी देऊ नका!

रस्त्याच्या कडेला पार्ंकग केलेली दुतर्फा वाहने हटवावीत तसेच आगमन-विसर्जनाच्या मार्गात अडथळा आणणारी झाडांची योग्य ती छाटनी करा, भायखळा येथून सुरू होणाऱया उड्डाणपुलावरून बस त्याचबरोबर अवजड वाहनांना परळ-लालबागच्या दिशेने प्रवासाची परवानगी देऊ नये, त्यांना कॉटन ग्रीन मार्गे वळवण्यात यावे तसेच बांधकामासाठी वाहतूक करणाऱया गाडय़ांनाही सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत परवानगी देऊ नये, अशी मागणी समन्वय समितीने पोलीस आणि मुंबई महापालिकेकडे केली आहे.

गणेशोत्सव मंडळांना आवाहन

परळ आणि लालबागमधील गणेश आगमन मार्गावरील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आले आहेत, मात्र हे खड्डे बुजवल्यामुळे रस्त्याची उंची वाढली आहे. त्यामुळे 25 फुटांपेक्षा जास्त उंची असलेल्या मंडळांनी आपल्या गणेशमूर्ती चिंचपोकळीच्या मार्गाने पुढे न्याव्यात, छायाचित्रकारांसाठी रस्त्याच्या कडेला गॅलरीसारखी व्यवस्था करावी ज्यामुळे अपघात टाळून छायाचित्रण करता येईल, असे आवाहन समन्वय समितीने गणेशोत्सव मंडळांना केले आहे.