1 नोव्हेंबरपासून गॅस सिलिंडर, GST संदर्भातील नियम बदलणार; जाणून घ्या तुमच्या खिशावर काय होणार परिणाम

1 नोव्हेंबरपासून आर्थिक क्षेत्रातील काही नियमांमध्ये बदल होणार आहे. त्याचा परिणाम तुमच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. 1 नोव्हेंबरपासून कोणते नियम बदलणार आहेत ते जाणून घ्या.

LPG सिलिंडरच्या किमतीत होणार बदल

प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किमती जाहीर केल्या जातात. सरकारी पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतीत बदल करतात. पाच राज्यांतील निवडणुका लक्षात घेता, नोव्हेंबरमध्ये घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ होण्याची शक्यता नाही, असे तज्ज्ञ सांगतात. हे दर स्थिर राहितील किंवा काहीशी कपात होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच सीएनजीचे दर देखील बदलू शकतात.

ई-चलान, जीएसटीबाबत नियमात बदल

नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC) नुसार, 100 कोटी किंवा त्याहून अधिक उलाढाल असलेल्या व्यवसायांना 1 नोव्हेंबरपासून 30 दिवसांच्या आत ई-चलन पोर्टलवर GST चलन अपलोड करावे लागणार आहे. जीएसटी प्राधिकरणानं यासंदर्भातील निर्णय सप्टेंबरमध्ये घेतला होता. NIC नुसार, 100 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या उद्योगपतींना 1 नोव्हेंबरपासून 30 दिवसांच्या आत पोर्टलवर ई-चलान अपलोड करावं लागणार आहे.

KYC अनिवार्य

उद्यापासून (1 नोव्हेंबर) विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने सर्व विमा धारकांना KYC करणं अनिवार्य केलं आहे. याचा तुमच्या क्लेमवर परिणाम होईल. तुम्ही नियमांचं पालन न केल्यास क्लेम देखील रद्द केला जाईल.

व्यवहार शुल्क

मुंबई शेअर बाजार म्हणजेच बीएसईने 20 ऑक्टोबर रोजी जाहीर केलं होतं की, ते 1 नोव्हेंबरपासून इक्विटी डेरिव्हेटिव्ह विभागावरील व्यवहार शुल्क वाढवतील. हे बदल S&P BSE सेन्सेक्स पर्यायांवर लागू होतील. व्यवहाराच्या वाढत्या खर्चाचा व्यापाऱ्यांवर, विशेषतः किरकोळ गुंतवणूकदारांवर नकारात्मक परिणाम होईल.

आयात संबंधित अंतिम मुदत

केंद्रानं HSN 8741 श्रेणीतील लॅपटॉप, टॅब्लेट, वैयक्तिक संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीवर 30 ऑक्टोबरपर्यंत काही सूट दिली होती. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही सूट कायम राहणार की 1 नोव्हेंबरपासून त्यात काही बदल होणार याकडे सगळ्यांचं लक्षं लागलं आहे.