इतर काय बोलतायत याकडे लक्ष देणार नाही, हरभजन सिंह मंदिर उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावणार

अयोध्या नगरी प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. 22 जानेवारी रोजी पार पडणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनसाठी प्रतिष्ठित लोकांना आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. या आमंत्रणांवरून बरंच राजकारण सध्या सुरू आहे. काहींनी यावर बहिष्कार घालायचं ठरवलं आहे तर काहींनी आवर्जून हजेरी लावण्यातं. आम आदमी पार्टी पक्षाचा खासदार आणि हिंदुस्तानचा माजी क्रिकेटपट्टू हरभजन सिंगने आपण या सोहळ्याला हजेरी लावणार असल्याचे म्हटले आहे.

हिंदुस्तानचा माजी फिरकीपट्टू आणि आम आदमी पक्षाचा खासदार हरभजन सिंग याने अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा समारंभात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. हरभजन सिंगने एका वृत्तसंस्थेला सांगितले की, समारंभाला कोण येणार आहे किंवा नाही याने मला काहीही फरक पडत नाही. काँग्रेसला किंवा इतर पक्षांना जायचे आहे की नाही, याने काही फरक पडत नाही, मी मात्र नक्की जाणार आहे. माझा देवावर विश्वास आहे आणि एक व्यक्ती म्हणून माझी ही भूमिका आहे. जर कोणाला माझ्या जाण्याने अडचण निर्माण होत असेल, तर ते त्यांना हवं ते करू शकतात. हे आपले भाग्य आहे की मंदीर बांधले गेलं आहे. त्यामुळे सर्वांनी जाऊन प्रभू श्री रामाचे आशीर्वाद घेतले पाहिजेत. असे त्याने म्हटले

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 22 जानेवारीच्या कार्यक्रमाला न जाण्याचे जाहीर केल्यानंतर काही दिवसांनी हरभजन सिंगने आपले मत मांडले. तो पुढे म्हणाला की, प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी मला अद्याप औपचारिक आमंत्रण मिळालेले नाही. पण 22 जानेवारीनंतर पत्नी, मुले आणि कुटुंबीयांसह मी अयोध्येला जाणार आहे.

आपचे नेते आणि दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनी चार शंकराचार्यांना पाठिंबा दिला आणि ते म्हणाले की, राम मंदिर उद्घाटनाला मी उपस्थित राहणार नाही आणि प्राणप्रतिष्ठा ही शास्त्राच्या विरुद्ध आहे. मंदिराचे बांधकाम अद्याप पुर्ण झालेले नाही. त्यामुळे प्राणप्रतिष्ठा करणे हे वेद आणि सनातन धर्माशी सुसंगत नसल्याचे चारही शंकराचाऱ्यांनी सांगितले आहे त्यामुळे त्यांच्या शब्दाचा आदर केला पाहिजे.