सलीलदांच्या सुरांची बरसात

>> हर्षवर्धन दातार

प्रख्यात संगीतकार सलील चौधरी यांच्या सुरावटींवर चिंब होण्याचा अनुभव नुकताच संगीतप्रेमींनी घेतला. निमित्त होतं ‘मेरे अपने सलीलदा’ कार्यक्रमाचे. ‘नॉस्टेल्जीआना’ या संगीत श्रवण मंचाने 2 जुलै रोजी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सलील चौधरी म्हणजे कवी, गीतकार, लेखक, संगीत दिग्दर्शन आणि संयोजन, उत्तम फ्लूट आणि पियानोवादक अश्या बहुमुखी प्रतिभांचे धनी. स्वतः कवी असल्यामुळे त्यांच्या संगीत रचनांतून भावना अतिशय उत्कटपणे व्यक्त होत. चाळीस वर्षांच्या कारकीर्दीत 13 भाषांतून जवळजवळ 150 चित्रपटांना संगीत इतका सलिदांचा प्रशस्त सांगीतिक ठेवा. त्यात मुख्यत्वे हिंदी, बंगाली आणि मल्याळी या भाषांतून त्यांनी गाणी दिली.

‘मेरे अपने सलीलदा’ कार्यक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे नेहमीच्या आणि ठरावीक निवेदन-गाणी या साच्याबाहेर जाऊन माहितीपूर्ण दृश्राव्य चित्रफिती आणि प्रत्यक्ष गाणी अशा मिश्र स्वरूपातून सलीलदांचे विविध पैलू श्रोत्यांसमोर पुढे आले. पाश्चात्य सुरावटीबरोबर हिंदुस्थानी शास्त्राrय आणि लोकसंगीताचे मिश्रण ही सलीलदांची संगीत निर्मितीची संकल्पना होती. गाण्यामध्ये कोरस, कॉयर, पाश्चात्य सुरावटी, एकाच चालीवर अनेक भाषांतली गाणी, सुरांचे जलद उतार-चढाव हे त्यांच्या सुरेल संगीत निर्मितीचे आधार काही लोकप्रिय व काही दुर्मिळ रचनांतून श्रोत्यांसमोर सादर झाले. इतर अन्य गाण्यांबरोबर ‘जानेमन जानेमन तेरे दो नयन’ (छोटीसी बात), ‘आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये’ (उसने कहा था), ‘जिंदगी कैसी है पहेली’(आनंद), ‘इतना ना मुझसे तू प्यार बढा’ (छाया), ‘जुलमी संग आंख लडी’ (मधुमती) या अवीट गोडीच्या गाण्याचा मनमुराद आनंद श्रोत्यांनी घेतला. गाण्याच्या शब्दातून अभिव्यक्तीत श्रेष्ठ असे कविराज शैलेंद्र आणि गीतकार योगेश गौड हे सलीलदांच्या सांगीतिक कारकीर्दीचा मुख्य आणि अविभाज्य भाग होते. कार्यक्रमाचा समारोप सलीलदांच्या या द्वयीबरोबरच्या गाण्यांनी झाला. ‘परख’मधलं शांत, नीरव असे ‘मेरे मन के दिये’ आणि ‘जागते रहो’ मधील ‘जागो मोहन प्यारे’ या अप्रतिम गाण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

सलीलदांचे संगीतकार पुत्र संजोय चौधरी कार्यक्रमाला मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांना वडिलांच्या हृद्य आठवणी जागवल्या. गायक सागर सावरकर, रैना लाहिरी, कोरस कलाकार आणि मोजक्याच पण वाद्यवृंदातील अतिशय सुरेल अशा साथीदारांनी कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचं नेटकं आणि ओघवत सूत्रसंचालन शंकर अय्यर आणि वंदना जानी-निगम यांनी केलं. असेच पुढील कार्यक्रम व्हावेत ही आशा अनेक श्रोत्यांनी व्यक्त केली, हे या कोविडपश्चात होणाऱया पहिल्या-वाहिल्या कार्यक्रमाचं फलित.