मंचावरील दुर्घटनेत बहुराष्ट्रीय कंपनीच्या सीईओचा मृत्यू, अध्यक्षाची प्रकृती गंभीर

अमिरेकास्थित विस्टेक्स एशिया-पॅसिफीक लिमिटेड कंपनीचे सीईओ संजय शहा यांचा एका दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला आहे. एका कार्यक्रमात मंचावरच झालेल्या दुर्घटनेत शहा गंभीररित्या जखमी झाले होते. हैदराबाद येथील रामोजी फिल्मसिटीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहा यांच्या कंपनीचे अध्यक्ष विश्वनाथ राजू दातला हे या अपघातात गंभीररित्या जखमी झाले असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात आले आहे. दातला हे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. विस्टेक्स एशिया-पॅसिफीक लिमिटेड या कंपनीच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात ही दुर्घटना घडली.

विस्टेक्सने त्यांच्या कंपनीचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम रामोजी फिल्म सिटीमध्ये आयोजित करण्याचं ठरवलं होतं. यासाठी या कंपनीचे पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी 2 दिवसांच्या निवासाची व्यवस्थाही करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी लाकडाने बनवलेले एक स्टेज तयार करण्यात आले होते. हे स्टेज 20 फूट 6 मिलीमीटर च्या लोखंडी वायरने दोन्ही बाजूने धरण्यात आले होते. दुर्दैवाने यातली एक वायर तुटल्याने हा लाकची मंच खाली उभ्या असलेल्या शहा आणि दातला यांच्यावर कोसळला.

मूळचे मुंबईचे असलेले संजय शाह यांनी 1999 मध्ये विस्टेक्स कंपनीची स्थापना केली होती. त्यांनी स्थापन केलेली कंपनी महसूल व्यवस्थापन उपायांमध्ये नावाजलेली कंपनी आहे. विस्टेक्सची उलाढाल सुमारे 300 दशलक्ष डॉलर्स इतकी असून ती कोका कोला, जीई, डाऊ, डेल, सिमेन्स,अडोबी, केलॉग्स, अबॉट, बायर, यामाहा, सोनी, यासारख्या कंपन्या विटेक्सची सेवा घेत आहेत.