देश भ्रष्टाचारमुक्त करू म्हणणाऱ्यांनी सर्व भ्रष्टचाऱ्यांना स्वत:च्या पक्षात घेतलं, जयंत पाटलांचा मोदींना टोला

देश भ्रष्टाचारमुक्त करू म्हणणाऱ्या पक्षाने देशातील सर्व भ्रष्टाचारी नेत्यांना स्वत:च्या पक्षात घेतले आहे, असा जबदरस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. वर्धा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या भव्य सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले.

काल-परवा मोदींनी एका सभेत म्हटले की काँग्रेस ही विकास विरोधी भिंत आहे. थोडे जाणीवपूर्वक पाहिले तर जाणवले की त्या विकास विरोधी भिंतीच्या सर्व विटा त्यांच्याच बाजूला बसलेल्या आहेत. ज्या मराठवाड्यासाठी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी विकासाचे दार उघडलं, मुख्यमंत्री लासराव देशमुख यांनी न्याय दिला, अशोक चव्हाण यांनी देखील अनेक विकास कामे केली त्या तिन्ही मुख्यमंत्र्यांच्या विकास कामांवर पाणी टाकण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, महागाई घालवू असे आश्वासन देऊन मोदी सरकारने सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवण्याचे काम केले आहे. आता राज्यभर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जनता एकवटू लागली आहे. त्यांना गावागावात प्रचार करणे मुश्किल होऊ लागले आहे.

शरद पवार कृषिमंत्री असताना देशात 72 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी झाली. याउलट गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले. ते न्याय मागण्यासाठी दिल्लीच्या वेशीवर पोहोचले. सुमारे 700 शेतकऱ्यांचा यात मृत्यू झाला. मात्र मोदी सरकारला दया आली नाही, असेही ते म्हणाले.

मोदी-शाह सत्तेत परतले तर लोकशाही संपलीच समजा – मल्लिकार्जून खरगे

आज शरद पवार यांच्या मागे जनमत उभे आहे. आपल्या वयाची पर्वा न करता सुमारे 55-60 सभा येणाऱ्या काळात घेण्याचे त्यांचे नियोजन आहे. एवढा प्रचंड मेहनत करणारा नेता आपले नेतृत्व करत आहे. हा परिवर्तनवादी विचार मजबूत करण्यासाठी अमर काळे यांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर देशात दंगली भडकतील! वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांचा इशारा