युट्यूबसाठी शाळा सोडली, आईनं घराबाहेर काढलं; आता महिन्याला करतोय 21 कोटींची कमाई

सोशल मीडियामुळे पैसा कमावण्याचे अनेक मार्ग नव्या पिढीला मिळाले. युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, टिकटॉकसह अनेक सोशल मीडिया माध्यमांवर चांगल्यातला चांगला आणि कधीकधी अगदी थिल्लर कंटेंट टाकूनही लोक मालामाल झाले. अर्थात यात सर्वांनाच यश मिळते असे नाही. सातत्य, नाविन्य आणि लोकांना आवडणारा, भावणारा कंटेंट दिला की फॉलोअर्स, व्ह्यूज वाढतात आणि त्याद्वारे कमाईही करता येते. आज आपण अशाच एका युट्यूबरबाबत जाणून घेणार आहोत जो महिन्याला जवळपास 21 कोटी रुपयांची कमाई करतोय.

जगातील सर्वात बडा युट्यूबर म्हणून जिम्मी डॉनल्डसन (Jimmy Donaldson) याचे नाव घेतले जाते. त्याच्या युट्यूब चॅनलवरील सबस्क्रायबर्सची संख्या 20 कोटींच्या पार गेली आहे. त्याच्याआधी फक्त एकाच युट्यूबरला हा जादुई आकडा पार करता आला आहे. हिंदुस्थानातील टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलने हा कारनामा केलेला असून टी-सीरिजचे 25.1 कोटी सबस्क्रायबर्स आहेत.

ऑनलाईनच्या दुनियेमध्ये जिम्मी डॉनल्डसन याला मिस्टरबीस्ट (MrBeast) नावाने ओळखले जाते. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलाईनमधील ग्रिनविले शहरात राहणाऱ्या 25 वर्षीय जिम्मीने जवळपास एका दशकापूर्वी वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी युट्यूबर म्हणून सुरुवात केली होती. आज त्याच्या एका व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळत असले तरी सुरुवातीला त्याला मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला. पहिल्या चार वर्षात त्याच्या हाती जास्त काही लागले नाही. मात्र 2016मध्ये त्याने शिक्षण सोडले आणि यूट्यूबवर व्हिडीओ व्हायरल कसा होतो याचा अभ्यास सुरू केला. शाळा सोडल्यामुळे त्याची आई नाराज झाली आणि तिने जिम्मीला घरातून बाहेरचा रस्ता दाखवला.

जिम्मीने हे दु:खही पचवले आणि युट्यूबचा अल्गगोरिदम अनलॉक करण्याचा प्रयत्न त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने सुरू केला. अखेर त्याला मार्ग सापडला. आज त्याचे युट्यूबवर 20 कोटींहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. तर टिकटॉकवर 8.5 कोटी आणि इन्स्टाग्रावर 3.9 कोटी लोक त्याला फॉलो करतात. तसेच मेटा या नवीन सोशल मीडिया थ्रेडवरही त्याचे 10 लाख फॉलोअर्स झाले आहेत. विशेष म्हणजे मार्क झुकरबर्गच्याही आधी त्याने हा टप्पा गाठला. याचा जल्लोष त्याने आपल्याच एका फॅनला चारचाकी गाडी भेट देऊन साजरा केला.

जिम्मीची एकूण संपत्ती 10 कोटी डॉलर्स (874 कोटी) आहे. तो फक्त युट्यूबच्या माध्यमातून महिन्याता 25 लाख डॉलर्स आणि वर्षाला 2.6 कोटी डॉलर्सची कमाई करतो. स्पॉन्सरशिफसाठी तो 10 लाख डॉलर्स फी घेतो. हेवा वाटावा अशा यशाबाबत जिम्मी म्हणतो, मी सतत युट्यूबचा विचार करत होतो. व्हिडीओ, फिल्मेकिंग हेच विचार माझ्या डोक्यात सुरू असायचे. 2017मध्ये पहिल्या व्हायरल व्हिडीओमध्ये त्याने एका खुर्चीवर बसून 1 लाखांपर्यंत आकडे मोजले होते. यासाठी त्याला 40 तास लागले होते. पुढे जसेजसे सबस्क्रायबर्स वाढू लागले, तसे त्याला जाहिराती मिळू लागल्या. यातून झालेली कमाई तो व्हिडीओ आणि आणखी चांगला कंटेंट बनवण्यासाठी वापरू लागला.