लोकल प्रवासी झाले स्मार्ट! यूटीएस मोबाईल अॅपचा वापर वाढला

उपनगरीय मार्गावरील प्रवासी स्मार्ट झाले आहेत. तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने यूटीएस मोबाईल अॅपचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध करून दिला आहे. त्याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून ऑक्टोबरमध्ये तब्बल दोन कोटी सात लाख प्रवाशांनी यूटीएस अॅपच्या माध्यमातून तिकीट काढले आहे. त्यातून रेल्वेला सुमारे 22 कोटी 18 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.

उपनगरीय लोकल मार्गावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असून त्यासाठी आवश्यक असलेले तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडक्यांसमोर प्रवाशांच्या मोठय़ा रांगा लागतात. त्या कमी करण्यासाठी रेल्वेने यूटीएस मोबाईल अॅप आणले असून त्याला प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोणतीही रांग न लावता सहजपणे मोबाईलवरून तिकीट काढता येत असल्याने बहुतांश प्रवासी त्याचा वापर करत आहेत. ऑक्टोबर महिन्यात मध्य रेल्वेची 2.7 कोटी तिकिटे काढली गेली असून एकटय़ा मुंबईत विभागात 2 कोटी 2 लाख तिकिटे मोबाईल अॅपद्वारे घेतली गेली आहेत. त्यामुळे तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी झाल्याचे दिसत आहे.