Lok Sabha Election 2024 – महायुतीत वादाची ठिणगी, बुलढाण्यातून भाजप नेत्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीमध्ये जागावाटपावरून वादाची ठिणगी पडली आहे. ठाणे, कल्याण आणि संभाजीनगरच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा अजून सुटलेला नसतानाच आता बुलढाण्यातही रस्सीखेच सुरू झाले आहे. मिंधे गटाने येथून प्रतापराव जाधव यांना तिकीट दिल्यानंतरही सोमवारी भारतीय जनता पक्षाचे नेते, लोकसभा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे उमेदवारी अर्ज दाखल केला.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मिंधे गटातच दोन गट पडले आहेत. मिंधे गटाने प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिल्यानंतरही आमदार संजय गायकवाड यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या जागेसाठी आता भाजपनेही फिल्डिंग लावली असून भाजपचे लोकसभा प्रमुख विजयराज शिंदे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे महायुतीमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

ठाणे, कल्याण, संभाजीनगरच्या जागेचा तिढा सुटेना, मिंधे-फडणवीसांची पहाटे 3 वाजेपर्यंत वर्षावर खलबते

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना विजयराज शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘हा मतदारसंघ आपल्या वाट्याला यावा अशी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भावना होती, त्यामुळे अर्ज भरून त्या भावनांना वाट मोकळी करून दिली. या मतदारसंघात भाजपचे तीन आमदार असून शिवसेना-राष्ट्रवादीतील फुटीनंतर मिंधे-अजित पवार गटाची ताकद कमी झाली आहे’, असे ते म्हणाले.

तसेच मिंधे गटाच्या आमदारानेही अर्ज भरल्याचा उल्लेख त्यांनी केला. लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून मला अर्ज भरण्याचा हक्क असून एबी फॉर्म मिळेपर्यंत जागांची अदलाबदली होऊ शकते, असे सूचक विधानही त्यांनी केले. यामुळे मिंधे गटाची चांगलीच तंतरली आहे.