लोणावळ्यात विदेशी दारूचा साठा जप्त, पुणे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

अवैधरित्या उच्चप्रतिच्या विदेशी दारूची सुरू असलेली वाहतूक उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणली. लोणावळा येथे करण्यात आलेल्या या कारवाई विविध ब्रॅण्डच्या पन्नास बाटल्या, वाहतूकीसाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन असा 23 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी बापु विठ्ठल आहेर व सुनिल रामचंद्र कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पादन शुल्कचे पुणे अधिक्षक चरणसिंह रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान लोणावळा परिसरात एका टेम्पोतून विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानूसार पथकाने लोणावळा भागात सापळा रचला. लोणावळा शहर हद्दीतील गोल्ड व्हॅल्ली रोडवर वाहन संशयीत वाहन पकडले. त्यामध्ये विदेशी कंपनीच्या तब्बल पन्नास बाटल्या आढळून आल्या. पथकाने आरोपींच्या ताब्यातून 23 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. उत्पादन शुल्क पुणे अधिक्षक चरणसिंह रजूपत, उपअधिक्षक सुजित पाटील, उत्तम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक देवदत्त पोटे, विठ्ठल बोबडे, संजय सराफ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.