आरक्षण द्या अन्यथा परिणामांसाठी तयार रहा; मनोज जरांगेंचे छगन भुजबळ आणि राज्य सरकारला आव्हान

मराठ्यांना आरक्षण मी घेऊन राहणार आणि तेही ओबीसीमधूनच घेणार, त्याला काय करायचं ते करू दे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शेवटचं सांगतोय, मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) द्या, अन्यथा परिणामांना सामोरं जा; असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. जालन्यातील भव्य सभेत मनोज जरांगे बोलत होते त्यावेळी त्यांनी राज्य सरकार व छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.

“आम्ही शांततेत आंदोलन करत असताना आमच्या आया बहिणींवर हल्ला करण्यात आला, त्यांचे रक्त सांडले. इतके निष्ठूर सरकार आम्ही पाहिलं नाही. एकीकडे म्हणतात की आमच्यावरील गुन्हे मागे घेणार, दुसरीकडे आमच्या लोकांना अटक करता. तीन महिन्यानंतर आमच्या लोकांना अटक केली. लातूरमध्ये आमच्या कार्यक्रमाआधी असं काय घडलं की त्या ठिकाणी अचानक संचारबंदी लागू करण्यात आली. लातूरला आम्ही कार्यक्रम घेणारच होतो. आमच्या लोकांवर अन्याय होतोय, पुढच्या काळात आम्ही सहन करणार नाही. एका व्यक्तीच्या दबावामुळे जर हे सगळं होत असेल तर सहन करणार नाही”, असा इशारा जरांगे यांनी दिला.

उदय सामंत, धनंजय मुंडे साहेब, संदीपान भुमरे साहेब, अतुल सावे हे उपोषणस्थळी आले होते तेव्हा त्यांनी आंतरवालीतील गुन्हे दोन दिवसात आणि महाराष्ट्रातील गुन्हे एक महिन्यात मागे घेणार असे सांगितले होते. आपले गुन्हे मागे घेण्यात येतील, एकालाही अटक होणार नाही असं सांगितलं होतं. मग कार्यकर्त्यांना का अटक केलं? तुम्ही आमच्या लोकांना अटक का केलं? असा सवाल जरांगे यांनी केला आहे.