ओबीसीतून आरक्षण दिले तरच उपोषण मागे, मनोज जरांगे यांचा इशारा

सगेसोयर्‍याच्या कायद्याची सरकारने अधिवेशनात चर्चा करावी. वेगळ्या आरक्षणाची चर्चा नको. ओबीसीतून आरक्षण दिले तरच उपोषण मागे घेऊ, सरकारचे वेगळे आरक्षण म्हणजे पळवाटा आहेत. वेगळे आरक्षण नको, ओबीसीतून आरक्षण दिले नाही तरी मी उपोषण मागे घेईन, हे सरकारने विसरावे, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला.

उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी आज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सरकार वेगळे आरक्षण देणार असल्याची चर्चा आहे, मात्र वेगळे आरक्षण नको. आम्हाला सगेसोयर्‍यांना आरक्षण कायदा लागू करण्यात यावा. मागासवर्गीय अहवाल स्वीकारून कायदा बनवावा. मुंबईच्या आंदोलनात मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विजयाचा गुलाल डोक्यावर टाकून घेतला. त्या गुलालाचा अपमान होईल हे विसरू नये, असा इशारा त्यांनी दिला.

15 फेब्रुवारीनंतर समाज काय करतो हे दिसेल

ज्यासाठी राजपत्रित अधिसूचना काढली त्यावर सरकारने बोलावे, वेगळे आरक्षण दिले तर त्याचा फायदा फक्त बाराशे ते तेराशे लोकांना होईल. 15 फेब्रुवारीच्या अधिवेशनात सरकारने सगेसोयरे कायद्याची जर अंमलबजावणी केली नाही आणि हैदराबाद गॅझेट स्वीकारले नाही, तर महाराष्ट्रात काय होते, मुंबईत मराठा समाज काय असतो हे यांना कळेल. आम्ही गाफील नाही, सरकार जसे आरक्षणाचे टप्पे टाकते तसे आमच्याही आंदोलनात टप्पे टाकले असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.

महाराष्ट्र बंद हा समाजाचा निर्णय

१४ तारखेच्या महाराष्ट्र बंदबाबत मला माहिती नाही. तो समाजाचा निर्णय असेल. तर समाजापेक्षा कुणीही मोठा नाही. फक्त शांततेत आंदोलन करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अमित शहांना गरज वाटली तर आंतरवालीत येतील

अमित शहांना गरज वाटली तर आंतरवालीत येतील, आमचे कुणीही त्यांना भेटायला जाणार नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. ४-५ लोकांच्या हट्टासाठी सरकारने मराठ्यांच्या पोरांच्या जिवाशी खेळू नये, असा इशारा त्यांनी दिला.

आंतरवाली सराटीत पुन्हा गर्दी होऊ लागली….

मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये चौथ्यांदा उपोषण सुरू केले आहे. यापूर्वी त्यांच्या याच उपोषणस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळायची. दरम्यान, १० फेब्रुवारीपासून त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केल्याने आंतरवाली सराटीत पुन्हा गर्दी होत आहे. जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मराठा आंदोलक जरांगे यांची भेट घेण्यासाठी येत आहेत. मात्र, कालपासून त्यांची प्रकृती खालावल्याने ते कोणासोबत ही बोलत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.