शेअर बाजारात दिवाळी!! मुहूर्त ट्रेडिंगमध्ये खरेदीला जोर, निर्देशांक 350 अंकानी वधारला

शेअर बाजाराने लक्ष्मीपूजनाचा मुहूर्तावर दिवाळी साजरी केली आहे. मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गुतंवणूकदारांनी जबरदस्त खरेदी केल्याने बाजार उजळला आहे. तसेच सेन्सेक्सने 350 अंकांनी उसळी घेतली आहे. बाजाराच्या विशेष मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स 345.23 अंकांच्या म्हणजे 0.53 टक्क्यांच्या वाढीसह 65,249.91 वर सुरू झाला. तर निफ्टी 121.90 अंकांच्या म्हणजेच 0.63 टक्क्यांच्या वाढीसह 19,529.50 वर सुरू झाला.

बाजारात कारभाराला सुरुवात होताच गुंतवणूकदारांनी खरेदीसाठी उत्साह दाखवला. त्यामुळे निर्देशांकानेही उसळी घेतली. प्री-ओपन सत्रानंतर मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 300 हून अधिक अंकांच्या वाढीसह सुरू झाला. तर निफ्टीही 100 हून अधिक अंकांच्या वाढीसह 19,500 ची पातळी ओलांडत सुरू झाला. एका तासाच्या मुहूर्ताच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी सलग सहाव्या वर्षी वाढीसह बंद झाले. 7.15 वाजता व्यवहार संपल्यावर सेन्सेक्स 354.77 अंकांच्या म्हणजेच 0.55 टक्क्यांच्या वाढीसह 65,259.45 वर बंद झाला. तर निफ्टी 100.20 अंकांच्या म्हणजेच 0.52 टक्क्यांच्या वाढीसह 19,525.55 वर बंद झाला.

शेअर बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या सर्व 30 कंपन्यांनी हिरव्या चिन्हाने सुरुवात केली होती. या काळात विशेष बाब म्हणजे छोट्या आणि मध्यम समभागांमध्ये जोरदार खरेदी दिसून आली. त्यामुळे ते तेजीत आले. टाटा मोटर्स, कोल इंडिया, यूपीएल, इन्फोसिस, ओएनजीसी यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ दिसून आली. बँकिंग शेअर्समध्येही वाढ झाली आणि एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या गुंतवणूकदारांनी भरपूर कमाई केली.

गेल्या पाच वर्षांपासून मुहूर्त ट्रेडिंगवर सतत तेजीच्या ट्रेंडप्रमाणेच या वर्षी दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग 2023 वर बाजाराचा कल सकारात्मक राहिला. 2235 समभागांपैकी सुमारे 1900 समभाग हिरवे राहिले. 2018 पासून दरवर्षी, मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना फायदा होत आहे. गेल्या 15 वर्षांचा इतिहास पाहिला तर या दिवशी तीन वेळा तोटा झाला आहे, तर गुंतवणूकदारांना 12 वेळा नफा झाला आहे. गेल्या वर्षी 2022 मध्ये मुहूर्तावर सेन्सेक्स 524 अंकांच्या वाढीसह बंद झाला होता.