‘मोदी-शहांमध्ये हिंमत नाही की…’, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे थेट आव्हान

लोकसभा निवडणुकीआधी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Telangana CM Revanth Reddy ) यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी एका इफ्तार पार्टीनिमित्त एकत्र आले होते. यावेळी ओवैसी यांच्यासह रेवंत रेड्डी यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात तेलंगणामध्ये अल्पसंख्यांक समाजाला दिलेले 4 टक्के आरक्षण हटवण्याची हिंमत नसल्याचे रेवंत रेड्डी म्हणाले.

रेवंत रेड्डी म्हणाले की, धर्मनिरपेक्ष सरकार चालवणे ही आमची जबाबदारी असून आम्हाला सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे. काँग्रेस पक्ष जेव्हा कधी सत्तेत आला तेव्हा अल्पसंख्यांकांना 4 टक्के आरक्षण दिले, कर्ज दिले. अल्पसंख्यांकांसाठी काँग्रेसने चांगल्या योजना आणल्या. काँग्रेस सरकारने आरक्षणाच्या लढाईसाठी सर्वोच्च न्यायालयात चांगले वकील नियुक्त केले. मुसलमानांच्या हिताचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. हिंदू आणि मुसलमान माझे दोन डोळे आहेत, असेही ते म्हणाले.

निवडणुका जवळ येतात तेव्हा भारतीय जनता पक्ष ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करते, असे म्हणत दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणाचा तेलंगणाची काहीही संबंध नसल्याचेही रेवंत रेड्डी यांनी स्पष्ट केले. हे प्रकरणी दिल्लीतील असून अरविंद केजरीवाल यांच्या सरकारविरोधातील आहे. केंद्रीय तपास यंत्रणा मोदींच्या हातातील कठपुतली सारख्या काम करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या एक दिवस आधी भाजपने राजकीय फायद्यासाठी बीआरएसच्या कविता यांना अटक केली. हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप रेवंत रेड्डी यांनी केला.