प्रचंड मेहनत करूनही दर पाच वर्षांनी पराभव का होतो, कळत नाही; सचिन पायलट यांची प्रतिक्रिया

देशात नुकत्याच पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यात तीन राज्यात भाजपने यश मिळवले आहे. राजस्थानमध्ये जनतेने प्रथेप्रमाणे सत्तापरिवर्तन करत भाजपकडे राज्याची कमान दिली आहे. राज्यात काँग्रेसने चांगले काम करूनही काँग्रेसचा पराभव झाला आहे. निवडणुकीपूर्वी जनमत काँग्रेसच्या बाजूने होते. तसेच सर्वेक्षणातूनही काँग्रेसचा विजय होणार असे सांगण्यात येत होते. तरीही काँग्रेसचा पराभव झाला आहे. या पराभवाबाबत काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

राजस्थानमध्ये दरवेळेप्रमाणे यावेळीही प्रथा कायम ठेवत सत्तापरिवर्तन झाले. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसचा पराभव झाला आणि भाजपने सरकार स्थापन केले आहे. या निकालानंतर काँग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही प्रत्येक वेळी खूप मेहनत करतो, पण दर पाच वर्षांनी पराभव का होतो, तेच कळत नाही, असे सचिन पायलट म्हणाले.

टोंक या आपल्या विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे सचिन पायलट यांनी आभार मानले. यावेळी सचिन पायलट म्हणाले की, आम्ही मजबूत विरोधी पक्षाची भूमिका बजावणार आहोत. तसेच, निवडणुकीपूर्वी भाजपचे अनेक मोठे नेते दिल्लीहून राजस्थानमध्ये आले होते. त्या नेत्यांनी राज्यातील जनतेला मोठमोठी आश्वासने दिली होती. त्यामुळे आम्ही त्यांना आश्वासने पूर्ण करण्यास सांगू. नवीन सरकार अजूनही आपले मंत्रिमंडळ स्थापन करू शकलेले नाही. मात्र, आम्ही त्यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत ती पूर्ण करण्यास सांगू, असेही सचिन पायलट म्हणाले.

विरोधी पक्ष म्हणून आम्ही मजबूत आहोत. यावेळी आमच्याकडे 70 आमदारांचे बळ आहे. सचिन पायलट यांनी काँग्रेसच्या पराभवाची खंत ही व्यक्त केली. आम्ही दरवेळी मेहनत करतो. जनमतही आमच्याबाजूने होते तरीही पराभव का झाला, तेच कळत नाही. यावेळी आम्हाला विजयाची पूर्ण खात्री होती. मात्र पराभव का झाला, ते कळत नसल्याचे पायलट म्हणाले.