मुंबईचा विकास निती आयोगाकडून करण्याच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

मुंबईच्या विकासासाठी आराखडा तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने निती आयोगावर सोपवण्याच्या योजनेच्या निषेधार्थ गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हुतात्मा चौकात आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करत हुतात्मा चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, मुंबई कार्याध्यक्ष राखी जाधव उपस्थित होत्या.

पीएमओ मुंबई चालवणार का?

निती आयोगाच्या मार्फत मुंबईचा विकास हाती घेतला तर मुंबई पालिका आणि मुंबईतल्या आमदार-खासदारांना काय अर्थ उरणार नाही. म्हणजे एक प्रकारे पंतप्रधान कार्यालय मुंबई चालवणार का? असासुद्धा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो. मुळात राज्य सरकारसमोर निती आयागाने मुंबईच्या विकासाबाबत जे सादरीकरण केले ते एका खासगी पंपनीने तयार करून दिले होते. मला असे कळले आहे की, या खासगी पंपनीने ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या एमएमआरडीएकडूनच मिळवली. म्हणजेच महाराष्ट्र सरकारकडूनच माहिती मिळवून ती पुन्हा महाराष्ट्र सरकारपुढेच सादर करण्यात आली. सरकारमधील कोणत्याच नेत्याला हे कसे कळले नाही? तसेच निती आयोग जो काही विकासाचा आराखडा राबवणार त्याची गॅरंटी कोण घेणार, असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला.