राम मंदिर सोहळ्यात एकही गरीब नव्हता, सर्वत्र फक्त श्रीमंतच दिसत होते; राहुल गांधी यांची मोदी सरकारवर टीका

22 जानेवारी रोजी अयोध्या येथे राम मंदीराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी देशभरातील दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले होते. पण या सोहळ्याला फक्त श्रीमंत लोक दिसले, एकही गरीब दिसला नाही, असा घणाघात राहुल गांधी यांनी बिहार मधील मोहनिया येथे नागरिकांशी संवाद साधताना केला.

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशात दाखल झाली. उत्तर प्रदेशात दाखल होण्यापुर्वी राहुल गांधींनी बिहारमधील मोहनिया येथील एका जाहीर सभेत नागरिकांशी संवाद साधाला. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. राहुल गांधी म्हणाले, भाजप आणि संघाच्या विचारसरणीमुळे देशात द्वेष आणि हिंसाचार पसरला आहे. या द्वेषाच्या विरोधात आम्ही एकत्र लढू आणि जिंकू. शेतकरी, तरुण, महिलांवर आर्थिक, सामाजिक अन्याय होतोय. अग्निवीर शहीद झाला तर त्याला शहीदाचा दर्जा हे सरकार देत नाही. तसेच पेंशन सुद्धा दिली जात नाही. सरकारकडून सैनिकांची फसवणूक केली जातं आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

बिहारच्या तरुणांना उद्देशून राहुल गांधींनी काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. ते म्हणाले की, बिहारच्या तरुणांना रेल्वेत नोकऱ्या मिळत नाही, कारण तुम्ही कंत्राटी कामगार व्हावे अशी केंद्र सरकारची इच्छा आहे. देशामध्ये 73 टक्के लोकसंख्या ही मागासवर्गीय (50 टक्के) , दलित (15 टक्के) आणि आदिवासी (8 टक्के) वर्गाची आहे. तरीसुद्धा देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांचे जे मालक आहेत. त्या मालकांच्या यादीत या 73 टक्के लोकसंख्येपैकी किती लोक आहेत? ही 73 टक्के लोकसंख्या ना सैनात आहे, ना उच्च न्यायालयात, ना सार्वजनिक क्षेत्रात. या 73 टक्के लोकसंख्येपैकी बहुतांश लोक बेरोजगार आहेत. ज्यांना रोजगार मिळतो, ते कंत्राटी कामगार आहेत. या लोकसंख्येचा वरिष्ठ नोकरशाहीत कोणताही सहभाग नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

राम मंदिर सोहळ्यावरून मोेदींना फटकारले

राम मंदीर उद्घाटनाला आमंत्रण फक्त श्रीमंतांना होतं, गरिबांना नाही अशी टिका राहुल गांधी यांनी यावेळी केली. ते म्हणाले की, राम मंदिराच्या उद्घाटनावेळी फक्त श्रीमंत लोक दिसले, पण एकही गरीब माणूस दिसला नाही. याचे कारण म्हणजे गरीब लोक मजूर म्हणून काम करत होते.

केंद्रातीस सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, जात जनगणना हा देशाचा एक्स-रे आहे. आमचे सरकार येताच आम्ही संपूर्ण देशात जात जनगणना करू. शेतकऱ्यांना हमीभाव देण्याची कायदेशीर हमी आम्ही देऊ. मोदींनी शेतकऱ्यांचा एक रुपयाही माफ केला नाही आणि देशातील 20-25 अब्जाधीशांचे 16 लाख कोटी रुपये माफ केले. जेव्हा आमचे सरकार होते तेव्हा आम्ही शेतकऱ्यांचे 70 हजार कोटी रुपये माफ केले होते.