पावसाळी अधिवेशन: राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे आमदार एकत्र बसणार?

शिवसेनेच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट तयार झाल्यानंतर पावसाळी अधिवेशन हे विधिमंडळाचं पहिलंच अधिवेशन असणार आहे. आजपासून सुरू होत असणाऱ्या या अधिवेशनात काय घडणार याकडे साऱ्यांचं लक्षं आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा गट सत्तेत आला असला तरी राज्यात पावसाची कमी, रखडलेल्या पेरण्या, बेरोजगारी, नोकर भरतीचे प्रश्न, वाढती महागाई, सरकारकडून सुरू असलेली उधळपट्टी यामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच पंचाईत होणार असल्याचं दिसत आहे.

अजित पवार गटाचा सत्तेतील प्रवेश अनेकांना आवडलेला नाही. त्यामुळे जनतेत नाराजी आहे. आता भाजप – मिंधे गटा सोबत गेलेला अजित पवार गट आहे तर विरोधक म्हणूनही राष्ट्रवादीचे नेते असणार आहेत. विशेष म्हणजे विधिमंडळातील राष्ट्रवादी कार्यालयात अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अजित पवार गट आणि शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना वेगळेवेगळे कार्यालय देण्यात आले नाहीत. पक्ष कार्यालय आधीचेच असून त्यात शरद पवार यांचा फोटोही कायम आहे. तर दरवाजावर अजित पवार गटाचे विधानसभा प्रतोद अनिल पाटिल यांच्या नावाची पाटी आहे.

राष्ट्रवादीत अजित पवार गट वेगळा झाल्यानंतर काही आमदारांनी शरद पवार यांना आपला पाठिंबा कायम असल्याचं म्हंटलं आहे. तर काही आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा जाहिर केला आहे. मात्र विधिमंडळातील राष्ट्रवादी कार्यालयात अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अजित पवार गट आणि शरद पवार गट यांना वेगळेवेगळे कार्यालय देण्यात आले नाहीत. त्यामुळे दोन्ही बाजूचे नेते एकत्रित बसणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

दरम्यान, आजपासून (17 जुलै) सुरू होणारं पावसाळी अधिवेशन 4 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. आज सकाळी 11 वाजता विधानसभेचं कामकाज सुरू होईल, तर दुपारी 12 वाजता विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात होईल.