पावसाळी आजार रोखण्यासाठी ‘रॅपिड’ शोधमोहीम!

फोटो- प्रातिनिधीक

वाढते पावसाळी आजार रोखण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून ‘रॅपिड शोध मोहीम’ राबवली जाणार आहे. यामध्ये कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त रुग्णांचा शोध घेऊन उपचार करण्यात येणार आहेत. यामुळे साथीच्या आजारांचा लवकरात लवकर शोध लागल्याने वेळेत उपचार करणे शक्य होणार असून साथीच्या आजारांना आळा घातला जाणार आहे.

पावसाळय़ात मुंबईत वाढणाऱ्या साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनात महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य व संबंधित यंत्रणांची विशेष बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान डॉ. शिंदे यांनी कोविडविरोधातील लढय़ाच्या धर्तीवर डेंग्यू, मलेरिया विरोधी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याची निर्देश दिले आहेत. याअंतर्गत डेंग्यू, मलेरियाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांचा मोहीम स्वरूपात शोध घेण्याचे व लक्षणे आढळून आल्यास वैद्यकीय चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या चाचणीमध्ये डेंग्यू, मलेरियाचे निदान झालेल्या रुग्णांनी वेळेवर औषध घ्यावे व आवश्यक ती काळजी घ्यावी, यासाठी ’टेलिफोनिक फॉलोअप’ घेता यावा, याकरिता सर्व 24 विभागांमध्ये कार्यरत असलेल्या नियंत्रण कक्षांमार्फत कार्यवाही करण्याचे निर्देशही डॉ. शिंदे यांनी दिल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली आहे.

‘कोविड वॉर रूम’चा उपयोग

  • सर्व खासगी प्रयोगशाळा व रुग्णालये यांनी त्यांच्याकडील सर्व डेंग्यू व मलेरिया रुग्णांची माहिती महानगरपालिकेला देणे बंधनकारक असेल.
  • कोविड काळात विभाग स्तरावर कार्यान्वित करण्यात आलेल्या ’कोविड वॉर रूम’चा उपयोग पावसाळी आजारांच्या प्रतिबंधासाठी करण्याचे निर्देश.
  • प्रत्येक विभागीय वॉर रूममध्ये एक डॉक्टर, एक समन्वयक आणि एक डेटा एन्ट्री ऑपरेटर दोन सत्रांमध्ये काम करतील.
    1 जुलैपासून तत्काळ लागू करण्यात आलेल्या सुधारित कार्यपद्धतीअंतर्गत कोविडच्या धर्तीवर घरोघरी जाऊन शोधमोहीम.

असा रोखणार डेंग्यू, मलेरिया
आरोग्य केंद्रामार्फत केलेल्या शोध मोहिमेअंतर्गत डेंग्यू किंवा मलेरियाचा रुग्ण आढळून आलेल्या कुटुंबासह जवळपासच्या परिसरातील सुमारे 250 घरांमधील नागरिकांचे ’रॅपिड’ सर्वेक्षण करून तापसदृश्य रुग्णांचे रक्त नमुने संकलित करून त्याच दिवशी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. तापसदृश्य रुग्णांना नजीकच्या पालिका रुग्णालयात पाठवले जाते.