अजित पवार, दादा भूसेंना नोटीस पाठवताना ईडीची शाई संपते की प्रिंटर बंद पडतो? – संजय राऊत

विरोधी पक्षाच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया सुरुच असून झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ईडीचे पथक पोहोचले आहे. दुसरीकडे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचीही ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचीही आज चौकशी होणार आहे. या कारवायांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सवाल उपस्थित केला.

पुण्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये खासदार संजय राऊत यांना ईडीच्या कारवायांबाबत विचारले असता ते म्हणाले की, आमच्या पक्षात जे पळपुटे होते ते अशा कारवायांना घाबरून पळून गेले. रविंद्र वायकर, किशोरी पेडणेकर आणि माझ्या सख्ख्या भावालाही नोटीस आली आहे. ईडी ही भाजपची विस्तारित शाखा आहे. हे चित्र देशासाठी चांगले नाही.

राज्यात 8 हजार कोटींचा अॅम्बुलन्स घोटाळा झाला. राहुल कुल यांचे 500 कोटींचे मनी लॉन्ड्रिंग आहे. दादा भूसे यांचा 200 कोटींचा घोटाळा आहे. अजित पवार यांच्या 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. प्रफुल्ल पटेल यांची 450 कोटींची संपत्ती ईडीने जप्त केल्याचे अमित शहांनी सांगितले. हसन मुश्रीफ यांचा एक पाय तुरुंगात असल्याचे भाजप नेते सांगत होते. मग या सर्वांना नोटीस पाठवताना ईडीची शाई संपते की प्रिंटर बंद पडतो? असा सवाल करत जे भाजपसोबत नाही त्यांना राजकीय सुडबुद्धीने त्रास दिला जात आहे, असा आरोप खासदार राऊत यांनी केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

देशाच्या पक्षांतरबंदी कायदा समिती अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयावरही राऊत यांनी टीका केली. हा सगळ्यात मोठा फ्रॉड असल्याचे ते म्हणाले. ज्या माणसाने 10 पक्षांतरे केली आणि पचवली, सर्वोच्च न्यायालयाने ट्रायब्यूनल म्हणून नेमल्यावरही बाजपचे हस्तक म्हणून शिवसेनेच्या फुटीला मान्यता दिली त्यांना पक्षांतरबंदी समितीवर नेमणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान आहे, असे राऊत म्हणाले.

देशाच्या पक्षांतरबंदी कायदा समिती अध्यक्षपदी नार्वेकर

दरम्यान, उद्या 30 जानेवारी रोजी महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षांची आणि इतर मित्र पक्षांची बैठक होत आहे. या बैठकीचे वंचित बहुजन आघाडीलाही सन्मानाने आमंत्रण पाठवले असून त्यांनी ते स्वीकारले आहे. देशात जी हुकुमशाही सुरू आहे, संविधानाचा अपमान आणि एकाधिकारशाही सुरू आहे याविरुद्ध प्रकाश आंबेडकर यांनी एक भूमिका स्पष्ट केली असून तीच भूमिका महाविकास आघाडीची आहे. आम्ही सगळे संविधानाच्या रक्षणासाटी मैदानात उतरलो असून वंचित बहुजन आघाडी भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल अशी कोणतीही भूमिका घेणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्य़ा संविधानाचे रक्षण करण्यासाठी ते आमच्यासोबत राहतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

हेमंत सोरेन यांच्या अडचणीत वाढ, ‘ईडी’चं पथक चौकशीसाठी दिल्लीतील निवासस्थानी पोहोचलं