मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात दिल्लीच्या गुलामीचा पट्टा; संजय राऊत यांचा घणाघात

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावर टीका करणाऱ्या मिंधे सरकारचा खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात दिल्लीच्या गुलामीचा पट्टा असल्याची घणाघात संजय राऊत यांनी केला. ते नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.

मानेचा पट्टा हा आजार असून असे आजार अनेकांना होतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही आजारी असतात, पंतप्रधान नरेंद्र मोदीही आजारी पडू शकतात. पण मानेच्या पट्ट्यापेक्षा यांच्या गळ्यात जो दिल्लीच्या गुलामीचा पट्टा आहे तो महाराष्ट्राला वेदना देणारा आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात एक पट्टा बांधलेला असून दिल्लीकर त्या पट्ट्याने खेळवत बसले आहेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

आमदार अपात्रतेचा निकाल 10 जानेवारीला येणार असून त्याआधी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावरही संजय राऊत यांनी निशाणा साधत देशातील न्यायव्यवस्था किती गंभीर अवस्थेत पोहोलही आहे हे दिसत असल्याचे म्हटले. नार्वेकर आधी अचानक आजारी पडले. आता ते अचानक बरेही झाले. बरे झाल्यावर ताबडतोब जाऊन मुख्यमंत्र्यांनाही भेटले. ज्यांना आपण ट्रिब्युनल म्हणतो, ज्यांना न्याय द्यायचा आहेते आरोपीच्या घरी जाऊन बंद दाराआड भेटतात ही आपली न्यायव्यवस्था आहे. त्यामुळेच डॉ. आंबेडकरांचे संविधान धोक्यात असल्याचे आम्ही म्हणतो. सर्वोच्च न्यायालयाने ज्याच्यावर न्याय करण्याची जबाबदारी सोपवली आहे तो न्यायमूर्ती उठतो, गाडीत बसतो, आरोपीबरोबर चहापान करतो आणि हसतहसत बाहेर पडतो ही या देशाची अवस्था असल्याची टीकाही राऊत यांनी केली.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीआधी महायुतीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून वाद सुरू आहे. यावर अधिक बोलण्याचे टाळत खासदार राऊत यांनी शिंदे गटाने महाराष्ट्रातील 48 जागा लढायला पाहिजे आणि अजित पवार गटानेही तितक्याच जागा स्वतंत्रपणे लढल्या पाहिजे असे म्हटले. यामुळे आपण कुठे आहोत हे त्यांना कळेल आणि जनता कोणाबरोबर आहे हे देखील कळेल, असे आव्हान राऊत यांनी दिले.

दरम्यान, तलाठी घोटाळ्याप्रकरणी पुरावा मागणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचाही राऊत यांनी समाचार घेतला. फडणवीस यांनी एव्हिडन्स अॅक्ट वाचावा. संविधान बदलून पुराव्याची नवीन व्याख्या त्यांनी बनवली आहे का? पुरावा म्हणजे काय? सत्य हा पुरावा असू शकत नाही का? सत्य हा सर्वात मोठा पुरावा आहे. जर संघ परिवाराला सत्य हा पुरावा वाटत नसेल तर त्यांनी ठिकठिकाणई नवीन कब्रस्तान खोदावे आणि सत्य पुरावे. तलाठी होणारे शेकडो पोरं रस्त्यावर उतरत आहेत, विरोधी पक्ष आवाज उठवत आहे. त्यांना पुरावा म्हणजे काय हवंय? सरकारमध्ये इतके निर्लज्ज लोक आहेत की उद्या महाराष्ट्र निर्माण झाल्याचा, तुम्ही मराठी असल्याचाही पुरावा द्या म्हणतील, असा टोलाही राऊत यांनी लगावला.