यापुढे पुन्हा लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात येणार नाही, राजन साळवी यांनी तपास अधिकाऱ्यांना ठणकावले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार राजन साळवी हे भाऊ व पुतण्या यांसह बुधवारी (दि.10) अलिबाग तालुक्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीला सामोरे गेले. आपल्याकडे संशय घेण्याइतपत संपत्ती नसून, मागील वर्षभरापासून आपण तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य केले आहे. तपास यंत्रणेने मागितलेली सर्व माहिती, कागदपत्रे त्यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. यामुळे आज तपास यंत्रणेपुढे हजर झालोय हे शेवटचे यापुढे या कार्यालयात पुन्हा येणार नाही. तपास यंत्रणेला काय निर्णय घ्यायचा तो घेऊ दे, माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे, असे आमदार राजन साळवी यांनी तपासिक अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.

आमदार राजन साळवी यांची मालमत्ते संदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू केली आहे. 14 डिसेंबर 2022 रोजी सर्वप्रथम आमदार साळवी हे अलिबाग लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात चौकशीला सामोरे गेले. तेव्हापासून वारंवार आमदार राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी, मुले, भाऊ, पुतण्या, वहिनी यांच्यासह निकटवर्तीयांची चौकशी करण्यात आली. आमदार साळवी यांनी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य केले. त्यांना हवी असलेली माहिती कागदपत्रे सादर केली आहेत.