पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी; आक्रमक विरोधकांची घोषणाबाजी, मागण्या मान्य न झाल्यानं सभात्याग, कामकाज तहकूब

vidhansabha

राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले असून हे अधिवेशन वादळी असणार याची चुणूक पहिल्या दिवशीच पाहायला मिळाली. विधिमंडळ अधिवेशन कामकाजाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत सभात्याग केला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील पावसाची आतापर्यंतची स्थिती आणि अनेक शेतकऱ्यांवर असलेलं दुबार पेरणीचं संकट या प्रश्नावर तातडीने चर्चा घेण्यात यावी अशी मागणी केली. मात्र ती मागणी मान्य करण्यात आली नाही. यानंतर थोड्याच वेळात विरोधकांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वेळातच विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

दरम्यान, याआधी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत सरकारवर टिका केली. मिंधे गटाला यावेळी लक्ष्य करण्यात आलं. ‘सासूमुळे वाटणी झाली आणि सासू वाट्याला आली’, ’50 खोके एकदम ओके’ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच ‘घटनाबाह्य’ ‘कलंकीत’ सरकारचा धिक्कार असो अशा आशयाचे बॅनर देखील झळकवण्यात आले होते. राज्यात पावसाची कमी, रखडलेल्या पेरण्या, बेरोजगारी, नोकर भरतीचे प्रश्न, वाढती महागाई, सरकारकडून सुरू असलेली उधळपट्टी यामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच पंचाईत होणार असल्याचं दिसत आहे.