WC 2023 – वर्ल्डकपआधीच कर्णधार तमीम इक्बालने केली निवृत्तीची घोषणा, बांगलादेशला मोठा धक्का

आयसीसीचा वन डे विश्वचषक यंदा हिंदुस्थानमध्ये रंगणार आहे. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होणार असून तत्पूर्वीच बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशच्या वन डे संघाचा कर्णधार तमीन इक्बाल याने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे ऐन विश्वचषकाच्या तोंडावर बांगलादेशला नवीन कर्णधाराचा शोध घ्यावा लागणार आहे.

गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास तमीम इक्बाल याने पत्रकार परिषद बोलावली आणि यात निवृत्तीची घोषणा केली. ही घोषणा करताना तो भावूक झाला. त्याने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे बांगलादेश क्रिकेट संघाला धक्का बसला असून चाहतेही निराश झाले आहेत.

माझ्यासाठी हा शेवट असून संघाला मी माझे सर्वोत्तम दिले आहे. मी माझ्या परीने प्रयत्न केल. या क्षणापासून मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करत आहे. माझ्या दीर्घ प्रवासात माझ्यासोबत असणारे सर्व सहकारी, प्रशिक्षक, बांगलादेश क्रिकेट संघाचे अधिकारी आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांचे आभार मानतो. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. प्रेम आणि विश्वास देणाऱ्या चाहत्यांचेही आभार मानतो, असे म्हणत तमीम इक्बाल याने निवृत्ती जाहीर केली.

पुन्हा शाकिब कर्णधार?

बांगलादेशचा संघ याआधीच वन डे विश्वचषकासाठी पात्र ठरलेला आहे. आता तमीम इक्बाल याने अचानक निवृत्ती घेतल्याने संघाची धुरा पुन्हा शाकिब अल-हसनकडे येण्याची शक्यता आहे. तो सध्या टी-20 संघाचा कर्णधार आहे. कसोटी संघाचा कर्णधार लिटन दास हा ही एक पर्याय बांगलादेशकडे आहे.

तमीमची कारकिर्द

तमीम इक्बाल याने बांगलादेशकडून 70 कसोटी, तर 241 वन डे सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 38.89च्या सरासरीने 5134 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 10 शतकांचा समावेश आहे. तर वन डे मध्ये त्याने 36.62च्या सरासरीने, 14 शतक आणि 56 अर्धशतकांच्या मदतीने 8313 धावा केल्या आहेत. वन डे मध्ये बांगलादेशकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.