स्टेशन भागात दहशत माजविणार्‍या अडसूळ टोळीवर मोक्का, बंडगार्डन पोलिसांची कारवाई

पुणे स्टेशनजवळील ताडीवाला रस्ता भागात दहशत माजविणार्‍या संघर्ष उर्फ भाव्या नितीन अडसूळ याच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील 44 गुंड टोळ्यांविरुद्ध कारवाई केली आहे.

संघर्ष उर्फ भाव्या नितीन आडसुळ (21), साहील राजू वाघमारे उर्फ खरखर सोन्या (22), अतुल श्रीपाद म्हस्कर उर्फ सोनू परमार (22, तिघे रा. ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशन) अशी कारवाई करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत. गेल्या महिन्यात आडसुळ आणि साथीदारांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली होती. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी आडसुळ, त्याचे साथीदार वाघमारे, म्हस्कर यांना अटक करण्यात आली होती.

आडसुळ, वाघमारे, म्हस्कर यांच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे 4 गुन्हे दाखल आहेत. त्यांनी ताडीवाला रस्ता भागात टोळी तयार करून दहशत माजविली होती. या टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष पाटील यांनी तयार केला होता. परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यामार्फत हा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांना सादर करण्यात आला होता. प्रस्तावाची पडताळणी करून पाटील यांना त्याला मान्यता दिली.