लोणी येथील खून प्रकरणातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

मालमत्ता खरेदी-विक्री प्रकरणात झालेल्या वादानंतर माजी सैनिकाचा खून करणाऱ्या येथील स्थानिक दैनिकाचा संपादक व त्याचा साथीदार कॅमेरामन या दोघांना नगरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने भोपाळ येथे मोठ्या शिताफीने पकडले. या कारवाईमुळे जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली.

दैनिकाचा संपादक मनोज वासुमल मोतीयानी (33, रा. सावेडीगांव, नगर) स्वामी प्रकाश गोसावी (28, रा. सावेडीगांव, नगर) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणाबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, काल दि. 30 रोजी लोणी ते तळेगांव जाणारे रोड, गोगालगांव शिवार, लोणी, ता. राहाता येथे कोणीतरी अनोळखी इसमाने अज्ञात कारणासाठी अंदाजे 45 ते 55 वर्षे वयाच्या पुरुषाच्या छातीवर हत्याराने भोसकून खून केला. या घटनेबाबत लोणी पोलीस स्टेशनचे पोना/निलेश मुक्ताजी धादवड यांच्या तक्रारीवरून लोणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ही घटना घडल्यानंतर येथील जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तात्काळ या घटनेतील चौकशी करून संबंधित आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागाचे एक विशेष पथक नियुक्त करून याची माहिती घेण्यास सुरुवात केली. पथकाने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेताना पथकास घटना ठिकाणी एका चारचाकी वाहनाचे टायर मार्कस् सापडले. त्याआधारे पथकाने आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुढील तपास सुरू केला.

पथकास सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक पांढरे रंगाची कार येताना व लागलीच जाताना दिसून आली. पथक त्या अनुषंगाने तपास करत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दि. 29 जुलै 2023 रोजी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या मिसिंग व्यक्ती विठ्ठल नारायण भोर (48, रा. गणेश चौक, बोल्हेगांव, ता. नगर) हे बेपत्ता असल्याबाबत तोफखाना पोलीस स्टेशन येथे मिसिंग दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली.

या मिसिंगमधील व्यक्ती आणि अनोळखी मृत व्यक्ती यांचे वर्णन मिळते जुळते असल्याचे निदर्शनास आल्याने दिनेश आहेर यांनी पथकास तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना सोबत घेऊन मिसिंग व्यक्तीबाबत सविस्तर माहिती मिळवण्याबाबत मार्गदर्शन केले. पथकास मिसिंग व्यक्ती विठ्ठल भोर यांच्याबाबत माहिती घेत असताना मनोज मोतीयानी यांच्याबरोबर मालमत्ता खरेदी-विक्रीचा व्यवहार असून त्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याबाबत माहिती मिळाली.

सदर महितीच्या अनुषंगाने पथकाने मनोज मोतीयानी रा. सावेडीगांव, नगर याचा शोध घेतला; परंतु तो पांढरे रंगाची हुंडाई कारमधुन त्याचा साथीदार स्वामी गोसावी यास सोबत घेऊन गेल्याची माहिती प्राप्त झाली. त्या आधारे नाशिक येथे नातेवाईकांकडे चौकशी करता तो भोपाळकडे निघाल्याची माहिती घेतली. सेंधवा, मध्य प्रदेश येथे जाऊन आरोपींचा शोध घेता तो सापडल्याने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी मयत विठ्ठल भोर याचे व मनोज मोतीयानी यांच्या मालमत्ता खरेदी विक्रीचा व्यवहार असून त्यावरून दि. 29 जुलै 2023 रोजी पांढरे रंगाची हुंडाई आय-20 कार मधून जाताना निंबळक, ता. नगर येथे मनोज मोतीयानी व मयत यांच्यात वाद झाल्याने मनोज मोतीयानी याने साथीदार स्वामी गोसावी याच्या मदतीने मयताचे छातीवर स्क्रूड्रायव्हरने वार करून त्याचा खून केला आणि मृत व्यक्तिचे प्रेत लोणी परिसरातील पेट्रोलपंपाजवळ फेकून दिले असल्याची कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली. ताब्यात घेतलेल्या दोघांना लोणी पोलीस स्थानकात हजर करण्यात आले. या घटनेचा तपास लोणी पोलीस स्थानक करत आहे.