आरोग्य विभागातील अडीचशे कामगारांचे वेतन थकले, कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषदेवर धडक

रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य विभागामधील सुमारे अडीचशे कर्मचाऱ्यांचे वेतन न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील सर्व कर्मचारी एकत्र आले आणि त्यांनी त्यांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली. यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या अन्य काही मागण्यांचा पुनरुच्चार केला.

आरोग्य विभागातील आरोग्यसेवक, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य पर्यवेक्षक, सफाई कामगार, परिचर या संवर्गातील अडीचशे कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले नाही. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर धडक देत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांची भेट घेतली. या भेटीत कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

त्या निवेदनामध्ये पुढील काही मागण्यांचा समावेश आहे. त्यामध्ये जून-जुलै महिन्यात अनुदान येऊनसुद्धा अनुदान मागणीशिवाय वेतन देयके पाठवलेल्या शृंखलेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. पंचायत राज सेवार्थ प्रणालीत विहित मुदतीत वेतन देयके प्राप्त न झाल्यास अथवा वेतन होण्यास विलंब झाल्यास संबंधित कार्यासन कर्मचारी व अधिकारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. जिल्हास्तरावर वेतन देयकांबाबत कामकाज पाहणीसाठी जबाबदारी निश्चित करण्यात यावी. जिल्हास्तरावर वेतन देयके किती आली आणि किती वेतन देयके आली नाहीत यासाठी पर्यवेक्षकीय अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करावी.

नियमित वेतनाव्यतिरिक्त मागणी न करता ज्यांनी अनुदान वापरले त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. वेतनाबाबत पाठपुरावा करण्याची जबाबदारी असताना कर्मचाऱ्यांकडून जबाबदारी पार न पाडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा विविध मागण्यांचा त्यामध्ये समावेश होता. यावेळी प्रशांत कांबळे, परशुराम निवेंडकर, कमलेश कामतेकर, राजेंद्र रेळेकर, बंड्या भस्मे, रमेश उमते, विवेक गावडे, उत्तम देवकाते, शेषराव राठोठ, सपना नाईक, मुग्धा अभ्यंकर, माधवी ठाकूर, दीपक पालांडे, विलास पावसकर आणि अन्य कर्मचारी उपस्थित होते.