वंदे भारत नव्या रंगात, नव्या ढंगात! भगव्या रंगातील गाडीची रेल्वेमंत्र्यांकडून पाहणी, सुरक्षा, सोयीच्या दृष्टीने सुचवले 25 बदल

देशातील पहिली ‘सेमी हायस्पीड ट्रेन’ अशी ओळख असलेली वंदे भारत आता नव्या रंगात-नव्या ढंगात देशवासीयांच्या सेवेत दाखल होणार आहे. निळय़ा आणि पांढऱ्या रंगातील वंदे भारतनंतर आता आकर्षक भगव्या आणि राखाडी रंगातील नवीकोरी वंदे भारत ट्रेन देशवासीयांच्या सेवेत दाखल होणार आहे.

नव्या रंगातील वंदे भारत गाडीची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच चेन्नईच्या आयसीएफ फॅक्टरीला भेट देत काम सुरू असलेल्या भगव्या रंगाच्या गाडीची पाहणी केली. तसेच त्यांनी सुरक्षेच्या आणि सोयीच्या दृष्टीने गाडीच्या बांधणीत 25 बदल सुचवले आहेत. त्यामुळे नव्या रंगात, नव्या ढंगात येणारी वंदे भारत ट्रेन प्रवाशांसाठी आणखी आरामदायक ठरणार आहे.

रेल्वेच्या ताफ्यात दाखल झालेल्या वंदे भारत ट्रेनची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशाच्या वेगवेगळय़ा 25 मार्गांवर वंदे भारत धावत आहे. वंदे भारतचे जाळे संपूर्ण देशभरात विणण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यानुसार दर आठवडय़ाला एका वंदे भारत गाडीची बांधणी केली जात आहे. दरम्यान, निळय़ा आणि पांढऱ्या रंगातील वंदे भारतपाठोपाठ आता भगव्या रंगातील वंदे भारतची बांधणी अंतिम टप्प्यात आली आहे. ही गाडी लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून ती प्रवाशांच्या पसंतीला उतरते का ते पाहावे लागणार आहे.

नव्या गाडीत अनेक बदल

  • सध्याच्या वंदे भारत ट्रेनच्या तुलनेत नव्या भगव्या रंगाच्या गाडीत सुरक्षेच्या आणि सोयीच्या दृष्टीने अनेक बदल असणार आहेत.
  • गाडीतील सीट आणखी आरामदायी केल्या जाणार असून चांगल्या दर्जाचे कुशन वापरले जाणार आहे.
  • अपंगांची व्हीलचेअर ठेवण्यासाठी गाडीत वेगळी जागा असणार.
  • सध्याच्या गाडीत मोबाईल चार्जिंग पॉइंट असला तरी त्यामुळे गैरसोय होते. त्यामुळे त्याच्या रचनेत काहीसा बदल केला जाणार आहे.
  • प्रवासात पायाला आराम मिळावा म्हणून फूट शेल्फची रचना बदलणार, चेअर आणि शेल्फमधील अंतर वाढणार.
  • पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी वॉश बेसिनची रचना बदलणार
  • टॉयलेटमध्ये पुरेशी प्रकाश व्यवस्था करणार.
  • गाडीची रचना करताना प्रवाशांकडून येणाऱ्या विविध सूचनांचीही दखल घेतली जाणार आहे.