आंदोलक कुस्तीपटू मैदानातून मॅटवर, व्हिसा न मिळाल्यामुळे विनेश दिल्लीतच 

राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे (डब्लूएफआय) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिंक शोषणाचे आरोप करून आंदोलन करणारे कुस्तीपटू आता आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीनिमित्त मैदानातून मॅटवर उतरले आहेत.  स्पर्धेच्या तयारीसाठी अनेकांनी कझाकिस्तान गाठलेसुद्धा. मात्र विनेश फोगाटला अद्याप व्हिसा न मिळाल्यामुळे ती अजूनही हिंदुस्थानातच आहे. 

विनेश फोगाटने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तीन वेळा पदके जिंकली आहेत. कझाकिस्तानमधील बिश्केक येथील प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी विनेश शनिवारी निघणार होती. मात्र तिचा पासपोर्ट अद्याप हंगेरियन दूतावासात अडकला आहे. विनेशकडे ईव्हिसा असल्याची माहिती क्रीडा मंत्रालय तसेच परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आली. टॉप्स आणि साई अधिकाऱयांनी परराष्ट्र मंत्रालयाला हे प्रकरण लवकरात लवकर सोडवण्यास सांगितले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने हंगेरियन दूतावासाशी याबाबत संपर्क साधला असून विनेशला लवकरात लवकर व्हिसा दिला जाईल, असे आश्वासन अधिकाऱयांनी दिले आहे. 

साक्षी, बजरंग पोहोचले कझाकिस्तानला 

विनेश फोगटसोबत जंतरमंतरवरील धरणे आंदोलनात उपस्थित असलेले बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक हे तिचे सहकारी कुस्तीपटू कझाकिस्तानला रवाना झाले आहेत. बजरंगसोबत त्याचे फिजिओ अनुज गुप्ता, पार्टनर जितेंद्र किन्हा आणि स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग तज्ञ काजी किरण आहेत. त्याच वेळी साक्षी मलिकसोबत तिचा पती सत्यव्रत कादियानही आहे.