पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून पतीने छन्नीने केली तिची हत्या

2018 मध्ये दिल्लीच्या बुरारी भागात एकाच कुटुंबातील 11 लोकांनी सामूहिक आत्महत्या केल्याने देशभरात खळबळ उडाली होती. त्यामुळे बुरारी हे नाव देशभरात चर्चेचा विषय ठरले होते. त्याच बुरारीमध्ये एका पतीने पत्नीची छिन्नीचा वापर करुन निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

आरोपीचे नाव कुंदन शहा (46) आहे. कुंदनची तक्रार होती की पत्नी आपल्याकडे सतत दुर्लक्ष करते आणि तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचा त्याला संशय होता. जेव्हा त्याला पत्नीच्या अनैतिक संबंधाबद्दल खात्री पटली तेव्हा तो अस्वस्थ झाला. घरी कोणी नसल्याची संधी साधत आणि रागाच्या भरात पत्नीची छिन्नीच्या सहाय्याने हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास जेव्हा पोलिसांना घटनेची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घरात महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मृतदेह पोलिसांनी बुरारी सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी त्या महिलेचा पती कुंदनला अटक केली असून त्याने त्याचा गुन्हा मान्य केला आहे.