जागतिक युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत हिंदुस्थानला चार पदके, 15 वर्षीय प्रीतिस्मिता भोईचे विक्रमी सुवर्णयश

हिंदुस्थानच्या 15 वर्षीय प्रीतिस्मिता भोई हिने जागतिक युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत महिलांच्या 40 किलो गटात क्लीन अॅण्ड जर्कमध्ये नवा जागतिक विक्रम करीत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. तिने स्पर्धेत एकूण 133 किलो वजन उचलून नवा इतिहास रचला. मात्र क्लीन अॅण्ड जर्क व स्नॅच मिळून जागतिक विक्रमाची बरोबरी करण्यासाठी तिला दोन किलो वजन कमी पडले.

प्रीतिस्मिता भोई हिने क्लीन अॅण्ड जर्कमध्ये गतवर्षीच्या विक्रमात एका किलोने सुधारणा करत 76 किलो वजन उचलले. याचबरोबर तिने स्नॅचमध्ये 57 किलो वजन उचलून एकूण 133 किलो वजन उचलून पहिला क्रमांक पटकाविला. हिंदुस्थानच्याच ज्योत्स्शा साबर हिने एकूण 125 किलो वजन (स्नॅच-56 किलो व क्लिन अॅण्ड जर्क – 69 किलो) उचलून रौप्य पदकाची कमाई केली. तुकाaची फातमा कोलपॅक एकूण 120 किलो (55 किलो व 65 किलो) वजन उचलून कांस्य पदकाची मानकरी ठरली.

पायलला रौप्य, बाबूलालला कांस्य

याचबरोबर 45 किलो गटात हिंदुस्थानच्या पायलने एकूण 147 किलो वजन (67 किलो व 84 किलो) उचलून रौप्य पदक पटकाविले. या गटात कोलंबियाची लॉरेन एस्ट्राडाने एकूण 151 किलो वजन (67 किलो व 84 किलो) उचलून सुवर्ण पदक जिंकले. याचबरोबर बाबूलाल हेम्ब्रोमने हिंदुस्थानला या स्पर्धेतील चौथे पदक जिंकून दिले. त्याने 49 किलो गटात एकूण 193 किलो वजन (86 किलो व 107 किलो) उचलून कांस्य पदकाला गवसणी घातली.