जालन्यातील पानेवाडीत तरुणाचा गोळीबार; एकजण गंभीर जखमी, आरोपीला अटक

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी येथे एका तरुणावर गावठी पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या गोळीबारत तरुण गंभीर जखमी झाला आहे. जालना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर त्याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमोल पांडुरंग शिंदे ( वय 30) असे जखमीचे नाव आहे. तर कुमार भानुदास शिंदे (32) असे गोळीबार करणार्‍या तरुणाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

काही दिवसांपुर्वी जालन्यातील गोळीबाराच्या घटनेत गजानन तौर याचा मृत्यू झाला होता. या घटनेचा तपास सुरू असून पुन्हा गोळीबार झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी येथे गुरुवारी आठवडी बाजार होता. गावातील कुमार भानुदास शिंदे (32) हा हातात गावठी पिस्तूल घेऊन बाजारात फिरत होता. त्याने काही जणांना धमकावले होते. त्यानंतर भावकीतील अमोल पांडुरंग शिंदे (30) याच्यावर कुमारने गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. घटनेवेळी बाजारात गर्दी असल्याने गावकर्‍यांनी कुमारला पकडून ठेवले होती. गावकर्‍यांनी घटनेची माहिती घनसावंगी पोलिसांना देताच फौजफाट्यासह पोलस घटनास्थळी दाखल झाले.

गंभीर जखमी झालेला अमोल शिंदेला जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपी हा पानेवाडी येथील असला तरी तो जालना येथे राहत होता. कधी कधी तो गावातही राहायला येत होता. या घटनेने पानेवाडी गावासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी एक गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केले आहे. तसेच त्याला अटक करण्यात आली आहे.