इस्रायलच्या हल्ल्यात 400 पॅलेस्टिनी ठार

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात 17 व्या दिवशी 24 तासांत तब्बल 400 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले. इस्रायलने उत्तर गाझावर आज सोमवारी सकाळी बॉम्बहल्ले केले. तर हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या सैनिकांवर टँकविरोधी क्षेपणास्त्रे डागली. यात एका सैनिकाचा मृत्यू झाला. गाझापट्टीत छापे घालण्यासाठी गेलेले सैनिक आणि हमास यांच्यात चकमक उडाली. दरम्यान, हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायली सैनिकांनी आपले रणगाडे आणि शस्त्रs सोडून पळ काढल्याचा दावा हमासने केला आहे. दरम्यान, हिजबुल्लाह जर युद्ध छेडत असेल तर त्याचे त्यांना अत्यंत वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशारा नेतन्याहू यांनी हिजबुल्लाहला दिला आहे.

गुंतवणुकदारांचे 12 लाख कोटी बुडाले

युद्धाचे पडसाद जगभरातील शेअर बाजारात उमटत आहेत. मुंबई शेअर बाजारात सलग चौथ्या सत्रांत सोमवारी सेन्सेक्स 826 अंकांनी घसरला. ‘निफ्टी’चा अंकही 260ने कोसळला. यामुळे गुंतवणुकदार हादरले असून, चार सत्रांत तब्बल 12 लाख कोटींचा फटका बसल्याचे वृत्त आहे.