भाजपची सभा झाली आणि अवकाळी पाऊस आला! आदित्य ठाकरेंचा सणसणीत टोला

छत्रपती संभाजीनगरात येताना लोक सांगत होते की दिल्लीत इंडिया आघाडीचं सरकार येणार. पण सकाळी भाजपची सभा झाली आणि अवकाळी पाऊस आला, असा सणसणीत टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ परभणीत प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. परभणीतील घनसावंगी येथे पार पडलेल्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना आदित्य ठाकरेंनी भाजपवरही हल्लाबोल केला. ‘छत्रपती संभाजीनगर येत होतं तेव्हा लोक सांगत होते, दिल्लीत इंडिया आघाडीच सरकार येणार. मात्र सकाळी भाजपाची सभा झाली आणि अवकाळी पाऊस झाला. 2014 पूर्वी एक चेहरा होता, चांगलं सरकार भाजप आणणार असं वाटत होतं. मात्र 2014 नंतर सगळं चित्र बदललं. 2019 पर्यंत उद्धव ठाकरेंनी सगळं सोडून यांना पाठिंबा दिला. मात्र त्यांनी विश्वासघात केला, असा घणाघात त्यांनी केला.

आम्ही राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन केलं, मात्र एकनाथ शिंदे 40 आमदार आणि खासदार सोबत घेऊन गेले. एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली. किती राजकारण, किती हुकूमशाही, जनता आता हे सहन करणार नाही. याचमुळे दक्षिण भारताने भाजपसाठी दरवाजे बंद केले आहेत. म्हणून ते आता उत्तर भारताकडे बघत आहेत. गॅस, पेट्रोल, डिझेलचे दर वाढत होते तेव्हा आम्ही लाठ्या खात असताना हे फोटो काढत होते. 10 वर्षांत जी आश्वासनं यांनी दिली ती पूर्ण केली का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.

भाजपच्या फोडा आणि राज्य कराच्या धोरणावरही आदित्य ठाकरे बरसले. ‘भाजपने सर्व राज्याती पक्ष फोडले आहेत. त्यामुळे आता 400 जागा निवडून येणार नाहीत, तर यांना घरी बसवणार आहेत. यांना संविधानाला हात लावायचा आहे, त्यांना बाबासाहेब यांचं संविधान नको आहे, म्हणून त्यांना अब की बार 400 पार जागा हव्या आहेत. आम्ही सत्याने लढत आहोत, आमच्यावर वार केले जात आहेत. मात्र आम्ही न घाबरता छातीवर झेलणार आहोत. खरी राष्ट्रवादी आणि खरी शिवसेना आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे.’ असं ते यावेळी म्हणाले.