जामखेडमधील तरूण व्यापारी आतीष पवार यांचा अपघाती मृत्यू; गुरुवारी मार्केट यार्डमधील लिलाव बंद

जामखेड- बीड मार्गावर बुधवारी रात्री क्रुझर व मोटारसायकलची धडक झाली. रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात जामखेडमधील तरूण व्यापारी आतीष भागवत पवार (वय 32) यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण मार्केट यार्ड परिसरात शोककळा पसरली आहे. त्यामुळे गुरूवारी मार्केट यार्डमधील सर्व लिलाव बंद ठेवण्यात येणार आहेत. गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणात तपनेश्वर येथील अमरधाम येथे आतीष यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आतीष पवार बुधवारी सायंकाळी 9 वाजण्याच्या सुमारास जामखेड-बीड मार्गावर मोटारसायकलने जात होते. त्याच मार्गावर विरुद्ध बाजूने क्रुझर वेगाने जामखेडकडे येत होती. हॉटेल शिवराजजवळ क्रुझर व मोटारसायकल समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात मोटारसायकलवरील आतीष भागवत पवार गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जामखेड येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणी करून त्यांना मृत घोषित करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेचा पंचनामा केला आणि क्रुझर गाडी पोलीस ठाण्यात आणली आहे. आतीष पवार यांच्या निधनाची वार्ता कळताच संपूर्ण जामखेड परिसरात शोककळा पसरली आहे. गुरुवारी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव बंद ठेवण्यात येणार आहेत. आतीष पवार यांचे सहा महिन्यांपुर्वीच लग्न झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, आई, वडील तसेच चुलते व चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे.