जालन्यात समृध्दी महामार्गावर जबरी चोरी करणारा सराईत जेरबंद; 4 गुन्हे उघडकीस, 1 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त

जालन्यात समृध्दी महामार्गावर जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. मोटार सायकल चोरी व घरफोडीचे 4 गुन्हे उघडकीस आले असून 1 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखा यश आले आहे. ही कार्यवाही गुरुवारी करण्यात आली.

जालना जिल्हयातील जबरी चोरी, घरफोडी व मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाल यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना जबरी चोरी, घरफोडी व मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना देत मार्गदर्शन केले होते.

29 नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार हे समृध्दी महामार्गावरील जबरी चोरी प्रकरणातील चंदनझिरा पोलीस ठाणे येथील दाखल कलम 392,34 भादंवि मधील अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेत असताना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, हा गुन्हा हा आरोपी अशोक उर्फ मुक्या भिकाजी तरकसे (रा. कन्हैया नगर, जालना) याने त्याचा साथीदारासह केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अशोक भिकाजी तरकसे याच्या राहत्या घरी तो सापडला. त्याला ताब्यात घेत गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्याने हा गुन्हा त्याच्या साथीदारासह केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्हयात चोरी झालेले 1 लाख 60 हजार रुपयांचे दागिने ज्यात दोन तोळयाची सोन्याची चैन व एक तोळयाची सोन्याची अंगठी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अशोक तरकसे याने या गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटार सायकलबाबत विचारणा करता त्याने ती मोटार सायकल बीड शहर येथील लाईफ लाईन हॉस्पीटलसमोरुन चोरी केल्याचे सांगितले. बीड शहर पोलीस ठाणे कलम 379 भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल असून हा गुन्हाही उघडकीस आला आहे. तसेच पोलीस ठाणे सदर बाजार हददीतील गणेश जिनिंग, समर्थ बँकेसमोरुनही अशोक तरकसे याने हिरो होंडा कंपनीची स्लेंडर प्लस मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यामध्ये सदर बाजार पोलीस ठाणे येथे कलम 379 भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल असुन हा गुन्हाही उघडकीस आला आहे.

पोलीस ठाणे सदर बाजार हद्दीतील भोकरदन नाका परिसरातील एका हॉटेलचे शटर उचकटुन हॉटेलचे काउंटर मधील 10 हजार रुपये रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली. त्यामध्ये पोलीस ठाणे सदर बाजार येथे कलम 457,380 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल असून हा गुन्हाही उघडकीस आणण्यात यश आले आहे. आरोपीला पुढील तपासससाठी चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ व सोबत स्थागुशाचे अमंलदार सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडधे, कृष्णा तंगे,सचिन चौधरी, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, सतिष श्रीवास, कैलास चेके, योगेश सहाने, धीरज भोसले, रमेश पैठणे यांनी केली आहे.