आभाळमाया – सर्वात लहान दिवस

>> वैश्विक

दिवसामागून  दिवस चालले, ऋतुमागुनि ऋतु’ असं ऋतुचक्र गेली सुमारे साडेचार अब्ज वर्षे अव्याहत सुरू आहे ते पृथ्वीच्या जन्मापासून, परंतु त्याचं काव्यमय  वर्णन करायला त्या वेळी माणूस अस्तित्वात आला नव्हता. निसर्गच सूर्य आणि सूर्यमालेच्या निर्मितीमधून एक विशाल ‘काव्य’ रचत होता. पाच अब्ज वर्षांपूर्वी  जन्मलेल्या सूर्याच्या याच निरीक्षणाचे ‘सनराइज’ आणि ‘सनसेट’ पॉइंट झाले ते माणसाला त्यातील ‘काव्यात्मकता’ समजू लागल्यावर. पुढे फिल्म फोटोग्राफी आली आणि ते क्षण विविध ठिकाणांहून टिपले जाऊ लागले. आपल्याकडे कन्याकुमारीला तर सूर्यास्त आणि चंद्रोदय एकाच वेळी पाहायला मिळण्याचा दुर्मिळ क्षण येतो तो चैत्र पौर्णिमेला.

सर्वसाधारणपणे दिवसाची विभागणी दिवसरात्रीत होते. अहोरात्र म्हणजेही दिवसरात्रच. मात्र हे ‘अहो’ आणि ‘रात्र’ वर्षभर सारखेच नसतात. कधी दिवस मोठा तर रात्र लहान आणि कधी त्याउलट, रात्र मोठी आणि दिवस लहान. उद्या 22 डिसेंबरला पृथ्वीवरचा या वर्षीचा सर्वात लहान दिवस असेल. म्हणजे सूर्य तुलनेने उशिरा उगवेल आणि लवकर मावळेल. खगोल अभ्यासकांसाठी उद्याची रात्र अमावस्येची असती तर निरीक्षणासाठी अधिक शुभ ठरली असती, परंतु कार्तिक महिन्यातली आवस 12 तारखेलाच होऊन गेली. त्यापुढे दहा दिवस म्हणजे दशमीचा चंद्र आकाशात प्रकाशमान असणार. वेळ काढून पिकनिकसाठी किंवा शेतात हुडहुडत, हुरडा खात रात्र जागवणाऱ्यांच्या दृष्टीने छान वातावरण असेल. अर्थात अवकाळी ढग नसतील तर.

गेल्या दहा ते पंधरा वर्षांत पारंपरिक ऋतुचक्र बिघडलेलं किंवा बदललेलं दिसतंय. पारंपरिक ऋतुचक्राचा अनुभव साधारण 1970 पर्यंत आम्ही घेतलाय. मग हळूहळू पावसाच्या काळातही कडक उन्हाळा आणि थंडीत पाऊस, गारपीट असा आश्चर्यकारक अनुभव  येऊ लागला. मध्यंतरीच्या एका दशकात गोवारीकर मॉडेलनुसार पाऊस ‘नेमेचि’ आणि भरपूर आला आणि मग जगभरचं ऋतुचक्र डळमळताना अनुभवाला येऊ लागलं. 1999 च्या सिंह राशीतील विलक्षण उल्का वर्षावाच्या रात्री थोडय़ाच वेळात वांगणीच्या आकशदर्शन जागेवर ‘धो धो’ पाऊस पडला. त्याचा बिलकूल अंदाज नव्हता. कारण आदल्या रात्री आम्ही तिथूनच ताशी 250 ते 300 तेजस्वी उल्का आणि प्रथमच दिसलेले अग्निगोलक (फायरबॉल) पाहून थक्क झालो होतो. बदलत्या ऋतुचक्राने पहिला धडा दिला होता.

उद्या सर्वात लहान दिवसाच्या आणि धुक्याच्या आवरणात दडलेल्या थंडीच्या रात्री महाराष्ट्रात कदाचित पावसाळी वातावरणही असेल. आपण पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात राहतो म्हणून 22 डिसेंबरला दक्षिण गोलार्धात मकर वृत्तावर गेलेला सूर्याचा दिवस ‘विण्टर सॉल्स्टाइस’ किंवा ‘अविष्टंभ’ म्हणून मानतो. या वेळी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये कडक उन्हाळा असतो.

सूर्य परवापासून हळूहळू उत्तरेकडे येऊ लागेल. हाच ‘उत्तरायणा’चा आरंभ. 22 मार्चला तो विषुववृत्तावर येईल आणि मोठा मोठा होत कर्क वृत्तावर गेलेला दिवस 21 जूनला सर्वाधिक मोठा असेल. त्याला आपण ‘समर सॉल्स्टाइस’ किंवा ‘विष्टंभ’ म्हणू. उद्या मात्र महारात्र असणार आहे. उद्याच्या दिवशी मुंबईच्या सकाळी हा लहान दिवस सुरू होईल. इथला सूर्योदय 7 वाजून 8 मिनिटांनी आणि सूर्यास्त 6 वाजून 5 मिनिटांनी होईल. थोडं पूर्वेला गेलं तर उदयकाल नेहमीप्रमाणे आणि आधी आणि अस्तकालही आधीच असेल. मुंबईचा उद्याचा दिवस 12 तासांच्या सरासरी हिशेबाने 2 तास 17 मिनिटे कमी तर रात्र सवाचौदा तासांची असेल. उज्जैनचा दिवस जवळ जवळ तीन तास छोटा असेल तर लंडनची रात्र तब्बल नऊ तासांनी वाढेल. तिकडे उत्तर ध्रुवबिंदूवर तर ऑक्टोबरपासून दाटत चाललेला मिट्ट काळोख उद्या सर्वाधिक जाणवेल आणि मार्चपर्यंत या भागात संधीप्रकाशही दिसणार नाही. तिथे सहा महिन्यांची रात्र मार्चमध्ये संपुष्टात येईल आणि पुढचे सहा महिने सतत सूर्यप्रकाश किंवा संधीप्रकाश राहील.

आमच्या मुंबईतल्या घराच्या पूर्वेकडच्या खिडकीतून गेली तीन वर्षे मला योगायोगाने सूर्याचं हे दक्षिणोत्तर भासमान भ्रमण सूर्योदयाला पाहायला मिळतंय. पावसाळय़ाच्या काळातही उजाडल्याचा क्षण ढगांआड असला तरी नीट लक्ष दिलं तरी जाणवतोच. निसर्गाच्या या किमयेचा आनंद उत्तुंग इमारतींनी परस्परांचा सूर्य अडवलेल्या भागात क्वचितच दिसतो. त्याबाबतीत मला भाग्यवान असल्यासारखं वाटतं, पण रोज उगवत्या सूर्याचं असं रम्य दर्शन किती घेत असतील? त्यांना सूर्याच्या या भासमान प्रवासातून तयार होणारा इंग्रजी ‘8’ या आकडय़ाच्या आकाराचा ‘ऍनालेमा’ म्हणजे एकत्रित वार्षिक भ्रमणमार्ग ठाऊक असेल का? शक्यता कमीच, परंतु मित्रहो, खगोलशास्त्राच्या निरीक्षणाची सुरुवात यातूनच सोप्या पद्धतीने होते. सूर्योदयाच्या काळातील ‘अरुणोदय झाला’ ही भूपाळी किंवा ‘मावळत्या दिनकरा’ या कविता, गाणी भावपूर्ण आहेतच, परंतु त्याचबरोबर या मोहक क्षणांमागचं वैज्ञानिक काव्यही समजलं तर जाणीव परिपूर्ण होईल. तेव्हा जमलं तर आणि निसर्गाने साथ दिली तर उद्याचा सूर्योदय, सूर्यास्त जरूर पाहा.