साय-फाय – अमेरिकेत सैन्य भरतीची समस्या

>> प्रसाद ताम्हणकर

काही दिवसांपूर्वी जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने ब्रिटनच्या मदतीने बंडखोरांच्या काही ठिकाणांवर हल्ले चढवले. या हल्ल्याची जगभरात चर्चा झाली. यासंदर्भात एका अजून विशेष चर्चेने सध्या जोर पकडला आहे आणि ती म्हणजे अमेरिकेची रोडावलेली सैन्य भरती. खुद्द अमेरिकेमधील अनेक युद्ध तज्ञ या विषयावर चिंता व्यक्त करत आहेत. सैन्यात नव्याने भरती करणे हे अमेरिकेपुढे जणू एक मोठे आव्हान निर्माण झाल्याचे चित्र सध्या दिसते आहे. नौसेना आणि हवाई सेनेपेक्षा पायदळात सैनिक भरती करणे जास्त अवघड होत असल्याचे चित्र आहे.

अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपैकी अवघी एक टक्के जनता लष्करात सामील आहे. जानेवारी 1973 पर्यंत अमेरिकेत तरुणांना लष्करात भरती होणे अनिवार्य होते. मात्र 1973 मध्ये हा नियम शिथिल करण्यात आला. त्यानंतर सैन्य भरती ऐच्छिक करण्यात आली. गेल्या 50 वर्षांत सैन्यात भरती झालेले सर्व लोक हे स्वेच्छेने भरती झाले आहेत. विशेष म्हणजे या भरती झालेल्या सैनिकांपैकी 80 टक्के सैनिकांच्या घरातील कोणी ना कोणी पूर्वी सैन्यात काम केलेले आहे. मातृभूमीसाठी प्रत्येकाने लढायला हवे हा विचार गेल्या 20-30 वर्षांत प्रचंड वेगाने मागे पडला असून असंख्य अमेरिकन नागरिकांना अमेरिकन सैन्याविषयी सामान्य माहितीदेखील ठाऊक नसते असे इथले तज्ञ सांगतात.

गेल्या दोन वर्षांत अमेरिकन सैन्याने भरतीचे जे लक्ष ठेवले होते, त्यात ते हजारोंच्या संख्येने मागे पडलेले आहेत. तरुणांची एकूणच मानसिकता युद्ध लढणे हे माझे नाही, तर इतरांचे काम आहे अशी बनलेली आहे. युद्ध क्षेत्रातील तज्ञ यासाठी बदलती मानसिकता, बदलती जीवनशैली, आर्थिक बदल अशा अनेक गोष्टींना जबाबदार ठरवत आहेत. काही तज्ञांच्या मते सैन्याला गरज असलेली संख्या आणि प्रत्यक्षात इच्छुकांची संख्या यामध्ये एक मोठी दरी पडण्याला मोठय़ा प्रमाणात कोविडसारखी महामारीदेखील जबाबदार आहे. सैन्य भरतीचे जे काही शारीरिक आणि मानसिक निकष आहेत, ते पुरे करण्यात अनेक युवकांना अपयश येत आहे. अनेक युवकांची शारीरिक क्षमता या आजाराने कमी झालेली आहे. अनेक महिला उमेदवारांनी लैंगिक छळाविषयीदेखील चिंता व्यक्त केली आहे. हा सैन्यासाठी अत्यंत गंभीर विषय आहे.

तणावग्रस्त अथवा नैराश्येचा आजार असलेल्या व्यक्तीला सैन्यात सामील करून घेतले जात नाही. कोविडनंतर अमेरिकेतील अनेक युवक नैराश्याच्या आजाराने ग्रस्त झाले आहेत किंवा तणावाखाली आहेत असा निष्कर्षदेखील काही तज्ञांनी मांडला आहे. सैन्य भरतीसाठी घेण्यात आलेल्या विविध चाचण्यांमध्ये इच्छुक उमेदवारांपैकी केवळ 29 टक्के युवक पात्र ठरले आहेत. अमेरिकेतील काही तज्ञांच्या मते वरील विविध कारणांबरोबर आर्थिक कमाई हा मुद्दादेखील काही प्रमाणात लागू होतो. आजच्या काळापेक्षा पूर्वीच्या काळी सैन्यात पगार आणि मानमरातब खूप जास्त होता. सैनिकांविषयी एक विशेष आदर समाजात व्यक्त केला जात असे. मात्र आजच्या तरुणाईला भुरळ पाडण्यात हे सर्व अपयशी ठरत आहे.

अमेरिकेने आपल्या बऱयाच मित्रराष्ट्रांच्या भूमीवर सैनिक तळ उभारून तिथे आपले सैनिक तैनात केलेले आहेत. अशा वेळी प्रत्यक्षात अमेरिकेच्या भूमीवर सैन्याची कमतरता भासण्याची चिन्हे दिसत आहेत. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यास सैनिकांची कमतरता कमी भासेल असे तज्ञांच्या एका गटाला वाटते आहे. मात्र विरोधी गटातील तज्ञ हा मुद्दा खोडून काढत आहेत. त्यांनी यासाठी पोनचे उदाहरण दिले आहे. पोन आणि रशिया या युद्धात आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला जात आहे. मात्र अशा वेळीदेखील दोन्ही बाजूंनी मोठय़ा प्रमाणावर सैनिक प्रत्यक्ष युद्धभूमीवर उतरवले गेले आहेत.

2018 साली केलेल्या एका सर्वेक्षणात 70 टक्के अमेरिकन जनतेने लष्करावर विश्वास दाखवला होता, जो आजच्या घडीला केवळ 46 टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. अमेरिकन सरकार पुन्हा एकदा लष्कर भरती अनिवार्य करण्याचा कायदा करण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. अमेरिकेत जे काही घडत आहे, ते इतर देशांसाठीदेखील एक जागरूकतेचा इशारा आहे असे म्हणावे लागेल.