लेख – नौदलाचे ‘प्रेरणा’दायी पाऊल

>> कॅप्टन नीलेश गायकवाड

यंदाच्या नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलानं पहिल्यांदाच आपल्या युद्धनौकेवर स्त्री कमांडिंग ऑफिसरची नेमणूक केली. महाराष्ट्राच्या कमांडर प्रेरणा देवस्थळी असं या पहिल्यावहिल्या महिला कमांडिंग ऑफिसरचं नाव आहे. त्या सध्या आयएनएस चेन्नई या युद्धनौकेवर फर्स्ट लेफ्टनंट म्हणून कर्तव्य बजावत आहेत. मूळच्या मुंबईच्या असलेल्या प्रेरणा यांनी 2009 मध्ये नौदलात प्रवेश केला होता. त्यांची नियुक्तीआयएनएस त्रिंकटच्या कमांडिग ऑफिसर म्हणून करण्यात आली आहे. अलीकडील काळात नवनवीन प्रयोगांनी भारतीय नौदल नवीन उंची गाठत आहे.

कोकणातील सिंधुदुर्गमध्ये पार पडलेला यंदाचा भारतीय नौदल दिन अनेक अर्थांनी वैशिष्टय़पूर्ण ठरला. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. त्यानुसार आता नौदलाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असणार आहे आणि नौदलाच्या पदांना भारतीय पद्धतीची नावं देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी  सशस्त्र दलांमध्ये नारी शक्ती वाढवण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. गेल्या  भारतीय संरक्षण विभागाच्या तिन्ही दलांत आता पुरुषांप्रमाणेच महिलांनाही संधी देण्यात येत आहे. जात, पंथ, धर्म आणि लिंग यांमधील फरक विसरून सगळ्यांना समान संधी देण्याचे भारतीय सशस्त्र दलाचे उद्दिष्ट आहे. याच उद्दिष्टाला अनुसरून भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रेरणा देवस्थळी असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. आयएनएस त्रिंकट या भारतीय युद्धनौकेच्या नेतृत्वपदी त्यांना नियुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी पॅप्टन देवस्थळी या आयएनएस चेन्नई या युद्धनौकेवर तैनात होत्या. त्या मूळच्या मुंबई येथील असून   त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून मानसशास्त्रात पदवी मिळवली आहे. त्यांचा भाऊदेखील भारतीय नौदलात अधिकारी म्हणून कार्यरत आहे.  प्रेरणा या टीयू- 142 वरील पहिल्या महिला निरीक्षक आहेत. ‘आयएनएस त्रिंकट’ ही युद्धनौका पश्चिम नौदल कमांडचा भाग आहे. ती प्रामुख्याने गस्त घालणारी युद्धनौका आहे. या युद्धनौकेच्या माध्यमातून मच्छीमारांना संरक्षण दिले जात आहे. घुसखोरी करणाऱ्यांविरोधात कारवाई करणे, शोध आणि बचाव मोहिमेत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणे या उद्देशाने ही युद्धनौका काम करते. ही युद्धनौका 46 मीटर लांबीची असून तिचे वजन 260 टन आहे.  ताशी 56 किलोमीटर वेगाने धावणारी ‘त्रिंकट’ युद्धनौका चार किलोमीटरपर्यंत मारा करणाऱ्या 30 मिमी तोफेने सज्ज आहे. प्रेरणा या उत्तम नॅव्हिगेशन इन्स्ट्रक्टर आहेत. तसंच नौदलाच्या ‘तोपुलेव्ह तू-142’ या समुद्री टेहळणी विमानाच्या निरीक्षक म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे सैन्यदलांमध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या तरुणींचे मनोबल उंचावण्यास निश्चितच मदत होणार आहे. त्यांच्यासाठी प्रेरणा या आयडॉल ठरतील यात शंका नाही.

भारतीय नौदलात 2020 मध्ये दोन महिला अधिकारी तैनात करण्यात आल्या होत्या.  भारतीय नौदलाच्या इतिहासात प्रथमच नौदलाच्या युद्धनौकांमध्ये या दोन महिला अधिकाऱ्यांना महत्त्वाची पदे मिळाली होती. यापैकी एक होत्या कुमुदिनी त्यागी आणि दुसऱ्या रीती सिंग. त्यांची हेलिकॉप्टर प्रवाहात ‘निरीक्षक’ (हवाई रणनीतिज्ञ) म्हणून निवड करण्यात आली. त्या देशातील पहिल्या महिला एअरबोर्न टॅटिशियन्स म्हणून ओळखल्या जातात. उत्तर प्रदेशातील मेरठ जिह्यातील रहिवासी असलेल्या कुमुदिनी त्यागी यांनी दहावीच्या परीक्षेपासून सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे वडील सुरक्षा एजन्सी चालवतात आणि आजोबा सुरेशचंद त्यागी पोलिसांत उपनिरीक्षक होते. कुमुदिनी यांनी बी.टेक केल्यानंतर सैन्यात भरती होण्याची तयारी सुरू केली. अहोरात्र मेहनत केल्यानंतर त्या नौदलात दाखल होऊ शकल्या. कुमुदिनी यांना डिसेंबर 2018 मध्ये कमिशन मिळाले. सबलेफ्टनंट रीती सिंग या लष्करी कुटुंबातून आलेल्या आहेत. त्यांच्या कुटुंबातील तीन पिढय़ा सैन्यात कार्यरत आहेत. रीती यांचे वडील एस.के. सिंग हे भारतीय नौदलातून निवृत्त झाले आहेत. त्यांची आई इंग्रजी शिक्षिका आहे.

चार वर्षांपूर्वी सबलेफ्टनंट शिवांगी यांनी नौदलातील पहिल्या महिला वैमानिक होण्याचा बहुमान पटकावला. भारतीय वायुदलात अनेक शक्तिशाली लढाऊ विमानांचा समावेश आहे. ही विमाने चालवण्यासाठी नौदलात अनेक दिग्गज वैमानिक आहेत. शिवांगी सिंग या त्यापैकीच एक आहेत. शिवांगी या पहिल्या महिला वैमानिक आहेत, ज्यांनी राफेलसारखे शक्तिशाली लढाऊ विमान चालवले. शिवांगी सिंग या उत्तर प्रदेशातील वाराणसी जिह्यातील रहिवासी आहेत. शिवांगी यांचे आजोबा व्ही.एन.सिंह सैन्यात कर्नल होते. शिवांगी यांना लहानपणापासूनच लढाऊ विमान उडवण्याचे स्वप्न होते. 2017 मध्ये देशाच्या पाच महिला लढाऊ विमान वैमानिकांच्या टीममध्ये त्यांची निवड करण्यात आली. शिवांगी यांनी ‘मिग 21’देखील उडवले आहे.

भारताचा विचार करता आपल्याकडे फेब्रुवारी 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर  महिलांना थेट सैन्यात भरती होण्याचा, वरिष्ठ पदे, कायमस्वरूपी कमिशन आणि लढाऊ भूमिकांमध्ये प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. सध्या भारतीय सैन्यात विविध पदांवर 7,093 महिला आहेत. नौदलात 748 महिला अधिकारी आहेत (वैद्यकीय आणि दंत अधिकाऱ्यासह) आणि हवाई दलात वैद्यकीय आणि दंत शाखा वगळता 1,636 महिला अधिकारी आहेत. अर्थात आंतरराष्ट्रीय स्तरावर पॅनडा, फ्रान्स आणि जर्मनी यांसारख्या देशांच्या सशस्त्र दलांमध्ये महिलांची टक्केवारी जास्त आहे.

भारतीय सशस्र दलांमध्ये येत्या काळामध्ये महिलांच्या कर्तृत्वाच्या अनेक कहाण्या जगासमोर आदर्श ठरणाऱ्या असतील. आज आपल्या नौदलाचे केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात काwतुक होत आहे. वैशिष्टय़पूर्ण नवनवीन प्रयोगांनी भारतीय नौदल दिवसेंदिवस नवीन उंची गाठत आहे. महिलांच्या समावेशाचा प्रयोगही असाच यशस्वी ठरणारा आहे. यंदाच हंगामात एक हजार अग्निवीर महिला सैनिक नौदलात सामील झाल्या आहेत. यामुळे नौदलाचे सामर्थ्य वाढणार आहे. महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने हे पाऊल निश्चितच महत्त्वाचे आहे.