पैसे मागायला तर ये, हात-पायच तोडतो; मिंधे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाची कॅटरर्सला धमकी

जंगी वाढदिवस झाला, लक्ष भोजनावळ उठली, पण कॅटरर्सचालकाने पैसे मागताच भडकला! पैसे मागायला तर ये तुझे हातपायच तोडतो अशी धमकी बिचाऱयाला मिळाली. हे प्रकरण आहे मिंधे गटाचे कर्तेधर्ते गद्दार आमदार संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत याची. कॅटरर्सचालकाने सिद्धांत शिरसाट याच्याविरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र राजकीय दबावापोटी अद्याप गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.

2017 मध्ये आमदार संजय शिरसाट यांचा वाढदिवस राजेशाही थाटात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या दिवशी नेते, कार्यकर्ते यांच्यासाठी शाही भोजनावळ ठेवण्यात आली होती. त्याचे कंत्राट संघर्षनगर येथील त्रिशरण गायकवाड यांना देण्यात आले होते. आमदार संजय शिरसाट यांच्यापाठोपाठ त्यांचे पुत्र सिद्धांत याचाही जंगी वाढदिवस झाला. दोन्ही वाढदिवसाच्या भोजनावळीचे बिल साडेचार लाख रुपये झाले होते. मात्र आमदार संजय शिरसाट यांनी हाराकिरी करून 75 हजार रुपये कमी करण्यास भाग पाडले. उर्वरित रक्कम देताना त्यांनी 40 हजार रुपये दिलेच नाहीत. बराच तगादा लावल्यानंतर 20 हजार रुपये दिले. अजूनही 20 हजार रुपये थकीत आहेत.

मागितले पैसे, मिळाली धमकी

17 डिसेंबर रोजी सायंकाळी त्रिशरण गायकवाड यांनी सिद्धांत शिरसाटला मोबाईलवर संपर्क करून उर्वरित 20 हजार रुपयांची मागणी केली. गायकवाड यांनी पैसे मागताच भडकलेल्या सिद्धांतने पैसे मागायला तर ये तुझे हात-पायच तोडून टाकतो अशी धमकी दिली. सिद्धांतने हात-पाय तोडण्याची धमकी दिल्यामुळे गायकवाड कुटुंब दहशतीखाली आले आहे.

सिद्धांत शिरसाटने दिलेल्या धमकीमुळे गायकवाड कुटुंब प्रचंड घाबरले आहे. त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे तसेच आमदार शिरसाट यांनी बिलातून कमी केलेले 75 हजार तसेच थकलेले 20 हजार रुपये असे एकुण 95 हजार रुपये त्वरित गायकवाड यांना परत देण्यात यावेत अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने केली आहे. यासंदर्भात पार्टीने पोलिसांना निवेदन देऊन सिद्धांत शिरसाटच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशीही मागणी केली आहे.

मी सातत्याने उर्वरित पैशाची मागणी करत आहे. मात्र आज पैसे मागताच मला हात-पाय तोडण्याची धमकी देण्यात आली. माझे थकलेले पैसे मिळावेत एवढीच माझी मागणी आहे. पैसे मिळाले नाही तर मी पुढील कारवाई करेन.

– त्रिशरण गायकवाड