आता काय बोलायचं! मालाडमध्ये 6 हजार किलो वजनाचा लोखंडी पूल चोरीला गेला

मुंबई, महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवत गुन्हेगार दररोज नवनवीन गुन्हे करत आहेत. मिंधे सरकारच्या काळात पोलीस यंत्रणेचा धाकच उरला नसल्याने गुंड आणि चोर शिरजोर झाले आहेत. या चोरांची भीती इतकी चेपली आहे की त्यांनी 90 फूट लांबीचा आणि 6 हजार किलो वजनाचा पूलच चोरून नेला. मालाडमधली ही घटना असून, असं कसं होऊ शकतं असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

मालाड मधील एका नाल्यावर तात्पुरत्या स्वरुपाचा म्हणून हा लोखंडी पूल उभारण्यात आला होता. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या अवाढव्य वायरींचे वेटोळे ठेवण्यासाठी म्हणून हा ब्रिज करण्यात आला होता. कालांतराने इथे पक्का ब्रिज बांधण्यात आला आणि त्यावर अवजड वायर हलविण्यात आल्या. तात्पुरत्या ब्रिजचे काम संपल्यानंतर तो क्रेनच्या सहाय्याने हटवण्यात आला. 6 जून रोजी हा ब्रिज इथे शेवटचा पाहण्यात आला होता, त्यानंतर हा ब्रिज दिसलाच नव्हता. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत बांगूर नगर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर त्यांना कळाले की ब्रिज ज्या परिसरात होता तिथे सीसीटीव्हीच नाहीयेत.

पोलिसांनी आजूबाजूच्या रस्त्यावरील सीसीटीव्ही तपासायला सुरुवात केली. यावेळी त्यांना एक भलामोठा ट्रक या ब्रिजच्या दिशेने जाताना दिसला होता. या ट्रकच्या नंबरच्या सहाय्याने ट्रक मालकाचा पोलिसांना शोध लावला आणि मग सगळं प्रकरण उलगडत गेलं. हा पूल चोरणाऱ्यांनी तो कापण्याचं सगळं साहित्य आणलं होतं, ज्याच्या मदतीने पूल तोडून तो ट्रकमध्ये भरून त्यांनी पळवून नेला होता. या पूल चोरीप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून यातला एकजण हा अदानी इलेक्ट्रिसिटीचा कर्मचारी आहेत. इतरजण हे त्याचे सहकारी असल्याचं उघड झालं आहे. या पुलाचे सगळे भाग आपल्याला सापडले असल्याचं अदानी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे.