नियम पाळा, निरोगी राहा!

>> वैद्य सत्यव्रत नानल

आयुर्वेद सांगतं की, रोजच्या जगण्यात काही साधेसोपे नियम पाळा आणि निरोगी रहा.

केसांची काळजी
केसांचे त्रास होऊ नयेत, केस गळणे, अकाली पांढरे होणे, केसात कोंडा होणे हे टाळण्यासाठी डोक्यावर रोज तेल लावावे. केस धुण्यासाठी केमिकल साबण,
शॅम्पू वापरण्यापेक्षा रिठा, शिकेकाई यांचे चूर्ण लिंबूरसात कालवून वापरावे. केसांवर थोडे तेल नेहमी राहू द्यावे. हाडांच्या पोषण प्रक्रियेतच केस, नखे बनतात असे आयुर्वेद म्हणतो. त्यामुळे हाडांचे पोषण सुधारण्याचे उपाय करावेत, म्हणजे केस, नखेसुद्धा चांगली बनतात.

डोळ्यांची निगा
रोज रात्री झोपताना गाईचे साजूक तूप एक-एक थेंब डोळ्यात काजळाप्रमाणे लावून झोपावे. सोमवार ते शुक्रवार तूप लावावे आणि शनिवार, रविवार तुपाऐवजी एरंडेल तेल एक-एक थेंब लावावे. याने दोन दिवस डोळ्यांची सफाई आणि पाच दिवस पोषण होणे सुरू राहते. डोळे कोरडे पडणे, डोळ्यांच्या स्नायूंचे रोग होणे, डोळ्यांचा रक्तपुरवठा बिघडणे, चष्म्याचा नंबर वाढणे हे सर्व याने टाळता येते. यासोबत पायाच्या तळव्याच्या खोलगट भागात रोज रात्री झोपण्यापूर्वी तिळाचे तेल जिरवावे. याने डोळ्यांचे पोषण सुधारते. डोळ्यांचा नंबर वाढणे थांबते.

कानांची काळजी
आठवडय़ातून एक वेळ कानात तेल सोडणे अतिशय उत्तम उपाय आहे. यासाठी एक टेबलस्पून खोबरेल तेलात एक लसूण पाकळी बारीक चेचून किंवा कापून टाकावी. एक हलकी उकळी आणून नंतर तेल कोमट होईपर्यंत थांबावे. हे तेल तीन ते पाच थेंब दोन्ही कानांत टाकावे.

त्वचेची काळजी
त्वचेवरील छिद्र घाम, धूळ याने बंद होऊन त्वचारोग, अंगावरील केस गळणे, कोंडा, तोंडावर फोड येणे, खरूज, नायटा, इसब, गजकर्ण असे अनेक त्वचारोग होतात. त्यामुळे उन्हाळ्यात दोनदा आंघोळ करावी. स्वच्छ, पांढरे आणि पातळ कपडे वापरावेत.

भांडी कोणती
स्टीलची भांडी, लोखंडी तवा, कढई आणि उलथणे/पलिता जेवण शिजवताना वापरावे. पाणी भरून ठेवण्यासाठी स्टील किंवा तांब्याचा (कॉपर) पिंप पावसाळ्यात आणि थंडीत वापरावा, उन्हाळ्यात मडके वापरावे. ऍल्युमिनियम, हिंडालियम, कॉपर यामधे अन्न शिजवू नये आणि ठेवूही नये. टपरी/हॉटेल्स अशा विविध ठिकाणी चहा किंवा अन्नपदार्थ ऍल्युमिनियममधे शिजवतात, ते टाळलेले उत्तम. पितळेच्या भांडय़ांना कल्हई करूनच वापरावे. ऍल्युमिनियमच्या भांडय़ात रोज सकाळी दूध तापवले जाते. हे चुकीचे आहे. याने आम्लपित्त, त्वचारोग, रक्ताचे रोग होतात.

फिल्टर्ड खाद्यतेल वापरा
रीफाईंड तेलापेक्षा फिल्टर्ड तेल चांगले, घाण्याचे तेल त्याहीपेक्षा चांगले. कमी प्रमाणात आणि नैसर्गिक स्वरूपात असलेले तेल वापरणे कायम उत्तम ठरते. आजकाल वेगवेगळ्या बिया खाण्याचे नवीन ट्रेंड सुरू झाले आहे. त्यात सूर्यफूल, करडई, कलिंगड, अळशी, कपाशी असे अनेक प्रकार अनेक जण खाताना दिसतात. हे त्वरित बंद करावे. ही सवय वाईट आहे. याने अनेक रोग होतात. जसे कलिंगडाच्या बिया खाल्ल्याने षंढत्व (इन्फर्टिलिटी) येते. अळशी बिया गरम पडल्या तर शौचावाटे रक्त पडते. पाळीमध्ये खूप रक्त जाते. कपाशी तेल किंवा बिया नियमित खाल्ल्याने रक्तस्राव होतो, रक्ताचे रोग होतात.

मीठ कोणते वापरावे
खडे मीठ, सैंधव, पादेलोण (काळे मीठ) असे प्रकार जेवणात ठेवावेत. अन्न शिजवताना मीठ घालू नये. शिजवलेल्या अन्नात वरून थोडे मीठ चवीपुरते घालावे किंवा अन्नात मीठ न घालता ताटात वेगळे थोडे मीठ घ्यावे आणि अन्न खाताना बोट बोट चघळावे. फ्री फ्लोइंग सॉल्ट वगैरे प्रकार खाऊ नयेत.

साखर आणि गूळ
साखर म्हणजे वाईट, विष असा अपप्रचार आजकाल केला जातो. तो चूक आहे. आपण गोड जास्त खातो हे मान्य करणे त्यापेक्षा जास्त चांगले. साखर, गूळ वगैरे पदार्थ कमीत कमी खाणे, चवीपुरते खाणे योग्य. त्यातही खडीसाखर/खांडसरी/पत्री साखर उत्तम. गुळाबद्दल म्हणायचे तर गूळ एक वर्ष जुना असेल तरच खावा, असे आयुर्वेद सांगतो. नवीन गूळ वापरल्याने मधुमेह होतो असे फक्त आणि फक्त आयुर्वेदाने सांगितलेले आहे.

मद्यपान
जे शरीरास खंगवते त्यापासून लांब राहणे कधीही उत्तमच. तरीही मद्यपान करायचेच असते त्याने आपापल्या वैद्यांना त्याबद्दलचे नियम विचारून समजून घ्यावेत. ऋतूनुसार मद्य प्रकार प्राशन कसे करावे, त्यासोबत इतर कोणते नियम पाळावेत याबद्दल आयुर्वेद अतिविस्तृत स्वरूपात वर्णन करतो. त्याबद्दल पुन्हा कधीतरी पाहू. असे साधेसोपे नियम पाळले तरी आरोग्य सुधारून निरोगी आयुष्य जगता येते.

[email protected]