ड्रग माफिया ललित पाटील नेपाळ सीमेवरून पळाला

कुख्यात ड्रग्ज तस्कर ललित पाटील नेपाळ सीमेवरून परदेशात पळाला असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  त्याच्या तपासासाठी 10 पथके कार्यरत असतानाही दोन आठवडे उलटूनही पुणे पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्याचे मोबाइल ट्रकरेकॉर्ड, संपर्कातील नातेवाईक, अटकेतील भाऊ आणि साथीदाराकडे तपासाचा ससेमिरा लावूनही पोलिसांना अद्यापही  यश आले नाही. दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोपात पुणे पोलिसांची प्रतिमा डागळली आहे.

मेफेड्रोन तस्करीप्रकरणात ससून रुग्णालयातून  पसार झालेला आरोपी ललित पाटील याने परदेशातील त्याच्या संपका&तील इतर तस्करांच्या मदतीने नेपाळ सीमेवरून परदेशात पलायन केल्याची शक्यता आहे. मलेशिया, थायलंड आणि दुबईमध्ये यापूर्वी त्याने मेफेड्रोन एक्सपोर्ट केले होते. त्याच आधारे त्याने तस्कराकडून मदत मिळवून नेपाळमार्गे पलायन केल्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली आहे.  दरम्यान, पोलिसांनी त्याचा  भाऊ भूषण पाटील आणि साथीदार अभिषेक बलकावडे याला अटक केले. त्यांच्याकडील तपासातही पोलिसांना अपेक्षित यश मिळाले नाही.

आरोपीकडील पेनड्राईव्हचा धांडोळा

ललिताचा भाऊ भूषण आणि साथीदार अभिषेक बलकवडे यांच्याकडे पुणे पोलिसांनी पाच दिवस चौकशी केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी पेन ड्राइव्ह आणि इतर साहित्य जप्त केले आहे. त्याद्वारे पथकाने नाशिक एमआयडासीमधील आरोपीच्या मेफेड्रोन तयार करणाऱ्या कारखान्याची पोलिसांनी तपासणी केली होती. आरोपींच्या घरी जाऊन नातेवाईकांकडे चौकशी करून करण्यात आली होती. मात्र, पोलिसांच्या कारवाईत अजूनही हाती काहीच न लागल्यामुळे दबाव वाढत चालला आहे.

पोलिसांवर कारवाई, डॉक्टरांवर कधी

ललित पाटील पसार प्रकरणात हलगर्जीपणा बाळगल्याप्रकरणी  पुणे पोलीस दलातील 9 जणांना  निलंबित करण्यात आले आहे. मात्र, याप्रकरणात उपचाराच्या नावाखाली पाटीलला कायमस्वरूपी रूग्णालयात ठेवण्याचे अभय देणाऱ्या काही डॉक्टरांविरुद्धही संशयाची सुई कायम आहे. याप्रकरणी त्यांचीही चौकशी करून दोषी असल्यास कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी करण्यात आली आहे.

आणखी सात आरोपी

ससून रुग्णालयातून मेफेड्रोन या अमली पदार्थाच्या तस्करीचे रॅकेट उघड झाल्यानंतर आता या प्रकरणी आणखी सात आरोपींची नावे तपासात निष्पन्न झाली आहेत. या गुह्यातील मुख्य आरोपी ललित पाटील व त्याचे साथीदार नाशिक येथे ज्या कारखान्यात मेफेड्रान तयार करीत होते तो कारखाना समाधान कांबळे याच्या नावावर आहे. अमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा माल पुरविणाऱ्यापासून तयार झालेले पदार्थ विक्री करणाऱ्यांची माहिती मिळाली असल्याची माहिती पोलीसांनी न्यायालयात दिली. समाधान बाबाजी कांबळे, जिशान शेख, शिवाजी शिंदे, राहुल पंडित ऊर्फ रोहितकुमार ऊर्फ अमितकुमार (सर्व रा. नाशिक), इम्रान शेख आणि गोलू, हरिष पंत अशी नव्याने निष्पन्न झालेल्या आरोपीची नावे आहेत.

पोलिसांच्या हाती काहीच नाही

पुणे पोलिसांची 10 पथके ललित पाटील याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आरोपींचे नातेवाईक, सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल कॉल रेकॉर्ड, पूर्वीचे रेकॉर्ड तपासले जात आहे. संशयितांकडे कसून चौकशी केली जात आहे, पण पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही.

उपचाराच्या नावाखाली ससूनमध्ये पाहुणचार झोडणाऱ्या ललित पाटीलने 2 ऑक्टोबरला रुग्णालयातून पलायन केले.  त्याला एका शिक्षण संस्था चालकाने मदत केली. त्याच्या मोटारीतून ललित पाटीलने पुण्यातून पलायन केले.