हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा 23 मेपर्यंत पूर्ण होणार

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे काम वेगाने सुरू असून आतापर्यंत 27 टक्के काम पूर्ण झाले आहे. शिवतीर्थाजवळील जुन्या महापौर बंगल्याच्या जागी स्मारकाचे काम सुरू असून  23 मे 2022 पर्यंत पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होईल, अशी माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रत्यक्ष अनुभूतीची जाणीव करून देणाऱया या राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. याविषयी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीत एमएमआरडीएकडून कामाविषयी माहिती देण्यात आली. यासाठी वास्तुविशारद म्हणून आभा लांबा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. टाटा प्रोजेक्ट लिमिटेडकडून हे काम केले जात आहे.

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामासाठी 16 नोव्हेंबर 2021 रोजी 400 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. आतापर्यंत पूर्ण झालेल्या कामासाठी 35.97 कोटी रुपये खर्च झाले आहेत. यामध्ये सुरू असलेल्या बांधकामाचा खर्च तसेच परवानग्या, स्टॅम्प डय़ुटी आदी कामांचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यात स्मारकातील प्रवेशाची रचना, कलाकार दालन, पुरातत्व इमारतीचे संवर्धन, महापौर बंगल्याचे नूतनीकरण, म्युझियम, विद्युत, वातानुकूलित यंत्रणा, वाहनतळ उभारणी, बागबगिचा तयार करणे, रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या कामाचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यासाठी 250 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

दुसऱया टप्प्याच्या कामासाठी 150 कोटींचा निधी प्रस्तावित असून यात तांत्रिक कामांचा समावेश आहे. लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/गोष्टी कथन, चित्रपट, व्हर्च्युअल रिऍलिटी, ऑडिओ व्हिज्युअल आदी कामांचा समावेश आहे.