टक्कल असलेल्यांसाठी घनदाट आनंदाची बातमी, संशोधनाने दाखवला आशेचा किरण

वयाची तीशी चाळीशी ओलांडली की अनेक पुरुषांना केस गळतीचा त्रास सुरू होतो. त्यामुळे अनेक पुरुषांना कमी वयातच टक्कल पडलेले देखील आपण बघितलेले आहे. 2018 मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार 18-35 वयोगटातील तब्बल 47 टक्के तरुणांना केसगळतीमुळे टक्कल पडले होते.

अनेक तरुण केस गळती थांबविण्यासाठी, टक्कल पडू नये म्हणून अनेक औषधं घेत असतात, वेगवेगळे शॅम्पू कंडिशनर वापरत असतात, ट्रिटमेंट घेत असतात. अशा तरुणांसाठी आता एक आशेचा किरण दिसला आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात टक्कल पडलेल्या तरुणांच्या डोक्यावर पुन्हा केस उगवले जाण्यासाठी एक पॅच तयार करण्यात आला आहे.

पुरुषांमधील टकलेपणाला मेल बल्डनेस पॅटर्न (एंड्रोजेनिक एलोपेसिया) असे म्हटले जाते. यामुळे डोक्याच्या स्काल्पमधील केस वाढीच्या ज्या पेशी असतात त्या मृत पावतात. त्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा केस उगवत नाहीत. केसांच्या मूळाशी असलेल्या रक्त वाहिन्यांमधील रक्ताच्या कमीमुळे देखील असे होते. त्यामुळे केसांना योग्य पोषण मिळत नाही व त्यामुळे टक्कल पडते.

वैज्ञानिकांनी टक्कल पडलेल्या व्यक्तींच्या डोक्यावर केस उगवावे यासाठी एक संशोधन केले आहे. यात त्यांनी एक सेरियम नॅनोपार्टिकल्सचा पॅच तयार केला असून त्याला पॉलिथिन ग्लाईकोल लिपिड कम्पाऊंडमध्ये गुंडाळले होते. त्यानंतर आपल्या त्वचेवर आढळणाऱ्या हाइल्यूरोनिक अॅसिडमध्ये हा पॅच घोळवला. अशा प्रकारे एक प्रॉस्थेटिक विग तयार करण्यात आला.

या विगचा पहिला प्रयोग उंदरांवर करण्यात आला. काही उंदराच्या शरीरावरील केस काढण्यात आले होते. त्यांच्यावर या विगचा प्रयोग करण्यात आला होता. ज्या उंदरांवर या विगचा वापर करण्यात आलेला होता. त्यांच्या अंगावर केस उगवले होते. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाला होता. आता या विगची चाचणी मनुष्यावर करणे बाकी असून तिथे ही चाचणी यशस्वी झाली तर टक्कल पडलेल्या व्यक्तींसाठी हा विग वरदान ठरणार आहे.