भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांना हायकोर्टाचा दणका; रामनवमीला झालेल्या हिंसेप्रकरणी चौकशीचे आदेश

मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. 10 एप्रिल 2022 रोजी खरगोन जिह्यात रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराप्रकरणी हायकोर्टाने चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेचा व्हिडीओ विजयवर्गीय यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. नेमका हाच व्हिडीओ त्यांच्यासाठी अडचणीचा ठरला.

विजयवर्गीय यांनी हा व्हिडीओ प्रसिद्ध करतानाच अल्पसंख्याकांबद्दल टिप्पणीही केली होती. त्यानंतर याप्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते अमिनुल सुरी यांनी इंदुर हायकोर्टात याचिका दाखल करत विजयवर्गीय यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. या याचिकेवर सुनावणी झाली. विजयवर्गीय यांनी तेलंगणाचा व्हिडीओ खरगोनचा असल्याचे सांगत अल्पसंख्याकांना भडकवणारा आणि शांतता भंग करणारा हा व्हिडीओ असल्याचे कॅप्शनही दिले होते. त्यामुळे समाजाची दिशाभूल करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न विजयवर्गीय यांनी केल्याचा आरोप करत सुरी यांनी पोलिसात धाव घेतली होती, परंतु पोलिसांनी काहीच कारवाई केली नाहीय. अखेर त्यांनी इंदुर हायकोर्टात याचिका दाखल केली होती.